पातुरात हार्डवेअरच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 06:43 PM2020-04-25T18:43:48+5:302020-04-25T18:43:56+5:30
या आगीत गोदाम व माल जळून खाक झाल्याने ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.
शिर्ला/ पातूर : पातूर शहरातील खानापूर रोडवर असलेल्या धनस्कार हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्सच्या गोदामाला २५ एप्रिल रोजी पहाटे आगआगली. या आगीत गोदाम व माल जळून खाक झाल्याने ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
बायपास परिसरात खानापूर मार्गावर श्याम धनस्कार यांचे हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्स सामानाचे गोदाम आहे. या गोदामात लाखो रुपयांचे साहित्य भरून ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाला दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल्सच्या सामानाचे पंचनाम्यानुसार ३२ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आग लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही; मात्र गोदामाचा विमा नसल्याचे समजते. गोदामाच्या बाजुलाच उभी असलेली गजानन वानखडे यांच्या मालकीची खासगी बस सुदैवाने आगीपासून वाचली. या बसचे आगीमुळे किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्याम धनस्कार यांनी तीन महिन्यांपूर्वी साडेसात लाख रुपये खर्चून गोदाम उभारले होते. त्यामध्ये धनस्कार परिवाराच्या तीन दुकानांचा माल ठेवण्यात आला होता. गटविकास अधिकारी विनोद शिंदे, तहसीलदार दीपक बाजड, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, अजय देशमुख, जयंत मसने, अजय ढोणे, रमण जैन, विजयसिंह गहिलोत, चंद्रकांत अंधारे, अंबादास उमाळे, राजू उगले, राकेशसिंह बायस व दिलीप इंगळे उपस्थित होते. आमदार नितीन देशमुख यांनी धनस्कार परिवाराला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच आग लागली की लावून देण्यात आली, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले.