परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान; पंचनामे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 01:13 PM2019-10-28T13:13:52+5:302019-10-28T13:14:21+5:30
गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.
अकोला: जिल्ह्यात गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानाचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा संपला असला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. शनिवार, २६ आॅक्टोबर रोजीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. सतत बरसणाऱ्या परतीच्या पावसाने, काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन व्यस्त असल्याच्या परिस्थितीत, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मात्र रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार आणि पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोयाबीन, ज्वारीला फुटले कोंब; कापूसही भिजला!
सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेले शेतातील सोयाबीन पावसात भिजले असून, अनेक ठिकाणी सोयाबीला तसेच ज्वारीला कोंब फुटले आहेत. पावसामुळे भिजलेला कापूसही गळून पडला आहे. त्यासोबतच गळून पडलेल्या कपाशीच्या पात्या-फुलं व बोंड्या मातीत मिसळल्या असून, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड!
कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंज्या शेतात लावण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसात सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून पीक वाचविण्याची धडपड शेतकºयांकडून केली जात आहे.