‘त्या’ गृहिणींचे अन्नदान रुग्णांसाठी ठरत आहे ‘अमृत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:37 PM2019-03-10T13:37:08+5:302019-03-10T13:37:13+5:30
दररोज येणाऱ्या डब्यांतून सर्वोपचारमधील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ‘अमृता’चा घास मिळतो.
अकोला: श्रीमंती पैशांची कितीही असली, तरी ती माणुसकीतून झळकायला हवी. याच माणुसकीच्या श्रीमंतीचा परिचय शहरातील काही गृहिणींच्या कार्यातून होतो. ज्यांच्या घरून दररोज येणाऱ्या डब्यांतून सर्वोपचारमधील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ‘अमृता’चा घास मिळतो.
सर्वोपचार रुग्णालय, ज्या ठिकाणी दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतो. यात बहुतांश रुग्ण बाहेरगावचे असतात. त्यापैकी अनेकांची खाण्या-पिण्याचीही सोय नसते. अशा परिस्थितीत सर्वोपचारमध्ये काही युवक घरगुती जेवणाचे डबे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वितरित करताना दिसून येतात; पण हे जेवण त्या युवकांकडून किंवा कुठल्या संस्थेकडून येत नाही. हे जेवण येते ते शहरातील विविध भागातील गृहिणींच्या स्वयंपाक घरातून. अनेकदा अशा प्रकारच्या अन्नदानास विरोधही केला जातो. थकलेल्या अन् गरजूंना कुठलाच मोबदला न घेता वितरित करण्यात येणाऱ्या या अन्नदानातून अनेकांची मने तृप्त होताना दिसून येतात. सर्वोपचारपर्यंत एका वाहनावर आलेले हे अन्न येथील समाजकार्य करणारे काही युवक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचवतात. यामध्ये आशिष सावळे, नितीन सपकाळ, विशाल कांबळे यांच्यासह इतरही युवक नियमितपणे अन्न वितरणाचे हे कार्य करतात.
प्रसिद्धीचा लोभ नाही!
हे जेवणाचे डब्बे पाठविणाºया महिलांसोबत संपर्क साधला असता, आमची ही शुद्ध समाज सेवा असून, त्यासाठी आम्हाला प्रसिद्धी नको असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच त्यांच्या या समाजसेवेची खरी तळमळ दिसून आली. रुग्णांसाठी अन्नदान करणाºया या गृहिणी गोरक्षण रोड, गीता नगर, हरिहरपेठ आणि सिंधी कॅम्प या भागातील आहेत.
या ठिकाणी केले जात आहे अन्नदान
सर्वोपचार रुग्णालयातील टीबी वॉर्ड, स्किन वॉर्ड यांच्यासह सर्वोपचार परिसरात अत्यंत गरजू व्यक्तींनाच हे जेवण दिल्या जाते.