ओशाळली माणूसकी.....अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:14 AM2020-05-30T10:14:38+5:302020-05-30T10:15:43+5:30
एका ५५ वर्षीय इसमाला कोरोनाच्या भीतीने कुणीही खांदा द्यायला तयार नसल्याने अखेर नातेवाइकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.
तेल्हारा : अकोला शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकी हरवत असल्याची प्रचिती २९ मे रोजी तेल्हारा शहरात आली. शहरातील एका ५५ वर्षीय इसमाला कोरोनाच्या भीतीने कुणीही खांदा द्यायला तयार नसल्याने अखेर नातेवाइकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे स्वत:चे नातेवाईक सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर यांचा २९ मे रोजी सायंकाळी मृत्यू झाला. घरी पत्नी व लहान मुले, त्यात लॉकडाउनमुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे अंत्यसंस्कार करणेसुद्धा कठीण होते. त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्न मृतकाच्या पत्नीसमोर उभा राहिला होता. अशातच मृतकांच्या पत्नीचा भाऊ शहरातच राहतो. कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडी घेऊन त्याच्यावर मृतदेह ठेवून स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मात्र माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तेल्हारा शहरात काही महिन्यांपूर्वी सामाजिक पुढाकारातून शवगाडी तयार करण्यात आली. शहरातील काही जणांनी ही गाडी मिळण्यासाठी प्रयत्न केला; मात्र ती सध्या परिस्थितीत बंद असल्याने त्यांना हातगाडीवरून मृतदेह नेण्याची वेळ आली.
युवकाने दिला माणुसकीचा परिचय
शहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वत:हून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थितीबद्दल माहिती घेतली. त्याला मृतकाच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. यावेळी त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली.