आर्द्रता घटली; आठवड्यात उष्णतामान वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:48+5:302021-03-09T04:21:48+5:30
अकोला : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण ...
अकोला : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८ . ८ अंशाच्या जवळपास जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यातच अकोल्याचे तापमान ३७ अंश सेल्सिअस पार गेल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
शहरातील शनिवारचे तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा होता. शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३६ टक्के होती. ती सायंकाळी घटून १६ टक्क्यांवर आली. त्यामुळे सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता. विदर्भात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूरचे तापमान ३७ अंशावर राहिले.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ मार्च ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४७ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २९ टक्के तर वाऱ्याचा वेग ६ किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
--------------------
शेतकऱ्यांना सल्ला
n तापमानात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालेभाज्या, भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर पिकास जमिनीतील ओलावा बघून आवश्यकतेनुसार ओलीत करावे.
n परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असेही सुचविण्यात आली आहे.