हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:44 PM2020-06-05T17:44:38+5:302020-06-05T17:45:01+5:30

जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Hundiwale murder case: bail pleas of two accused rejected | हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

Next

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे आणि मोहम्मद साबीर या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर, मुन्ना ऊर्फ प्रवीण श्रीराम गावंडे हे फरार झाले होते. त्यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली.
या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना आधी पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता दोन्ही आरोपी कारागृहात असल्याने त्यांनी जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या दोन आरोपींसोबतच मंगेश श्रीकृष्ण गावंडे या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: Hundiwale murder case: bail pleas of two accused rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.