झोपडीतील कुटुंबास दीड लाखाचे विद्युत बिल!
By admin | Published: April 14, 2016 01:40 AM2016-04-14T01:40:00+5:302016-04-14T01:40:00+5:30
दारिद्रय़रेषेखालील कुटुंबाने घेतली धास्ती; महावितरणचा प्रताप.
वाशिम: मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या दारिद्रय़रेषेखालील कुटुंबास दीड लाख रुपयांहून अधिक विद्युत देयक देण्याचा महाप्रताप महावितरणने केला आहे.
वाशिम येथील देवपेठ परिसरालगत असलेल्या झोपडपट्टीत जनार्दन गणपत गायकवाड वास्तव्यास आहेत. पत्नी, दोन मुले, मुलगी असे कौटुंबिक सदस्य असलेल्या गायकवाड यांच्या झोपडीवजा घरात जेमतेम चार दिवे, दोन पंखे व दूरदर्शन संच एवढीच विजेवर चालणारी उपकरणे वापरात असताना महावितरण कंपनीने मात्र त्यांना मार्च २0१६ चे तब्बल १ लाख ५४ हजार ३७0 रुपयांचे वीज देयक पाठवले. या प्रकाराची गायकवाड कुटुंबीयांनी धास्तीच घेतली आहे. दरम्यान, देयकात चूक असल्यास सुधारित देयक देण्याचा पवित्रा महावितरणने घेतला.