टाकळी खेट्री परिसरात शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन झाल्याचे उघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:41+5:302021-09-17T04:23:41+5:30
काही शेतकऱ्यांनी त्या शासकीय जागेतून नदीवरून शेतात सिंचनासाठी पाइपलाइन केली होती. परंतु वाळूचे उत्खनन केल्यामुळे काही शेतकऱ्यांची पाइपलाइन फुटली ...
काही शेतकऱ्यांनी त्या शासकीय जागेतून नदीवरून शेतात सिंचनासाठी पाइपलाइन केली होती. परंतु वाळूचे उत्खनन केल्यामुळे काही शेतकऱ्यांची पाइपलाइन फुटली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वाहनाने वाळूची अवैध वाहतूक करण्यात आली आहे. उत्खननामुळे शेजारी असलेल्या शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे. मन नदीच्या काठावरील टाकळी खेट्री परिसरातील अर्धा एकर शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आली. याबाबतची तक्रार टाकळी खेट्री परिसरातील शेतकऱ्यांनी थेट पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची तहसीलदार दीपक बाजड यांनी तत्काळ दखल घेऊन तलाठी मिलिंद ईचे यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सदर निर्देशानुसार १६ सप्टेंबर रोजी तलाठी यांनी वाळूचे उत्खनन झाल्याच्या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांसमोर पंचनामा केला. यावेळी शेकडो ब्रास वाळू उत्खनन झाल्याचे उघडकीस आले. सदर पंचनामा तलाठी यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे सादर केला असून, त्यावर काय कारवाई होते, याकडे टाकळी खेट्री परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेत रस्त्याची दुरवस्था शेतकरी संतप्त
वाळूचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केल्यामुळे शेत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून, उत्खनन व वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.
त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तहसीलदार यांच्या निर्देशाप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणाचा पंचनामा करण्यात आला असून, सदर अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
-मिलिंद इचे, तलाठी टाकळी-खेट्री
टाकळी, खेट्री परिसरातील शासकीय जागेतून गेल्या दोन महिन्यापासून वाळूचे उत्खनन सुरू असल्याने माझी पाईपलाईन फुटली. वाहनाने अवैध वाहतूक केल्यामुळे शेत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. संबंधितांनी कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करावे लागेल.
-आसिफ बेग, शेतकरी टाकळी-खेट्री
160921\img20210916122306.jpg
????