मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:18+5:302021-09-08T04:24:18+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ...
संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक भागांतील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे, तर पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.
तालुक्यातील वाहनाच्या पेढी, पूर्णा, कमळगंगा, उमा आणि काटेपूर्णा नदीसह-नाल्यांना प्रचंड पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
पोळा सणाच्या दुपारपासूनच तालुक्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. पावसामुळे नदीकाठावरील संपूर्ण गावात पुराचे पाणी शिरल्याने गावातील घरांनाही त्याची झळ सोसावी लागली. या पावसाने पिकांना जीवनदान मिळाले असले, तरी शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची पेरणी व्यवस्था यावर्षी प्रभावित होऊन तीन ते चार टप्प्यांमध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. असे असताना पोळा सणाच्या मध्यरात्री जोरदार पावसाचे आगमन झाल्याने प्रतीक्षेत असणाऱ्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. तालुक्यातील काही भागात जोरदार, तर काही गावात अतिवृष्टी झाली आहे. नद्यांना पहाटेच्या सुमारास प्रचंड पूर आल्याने तालुक्यातील ४०० हेक्टरवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर तसेच धामोरी, कार्ली, जामठी, आकोली या गावांतील नदीकाठच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
-----------------
कार्ली, धामोरीचा १८ तास संपर्क तुटला
तालुक्यातील कार्ली आणि धामोरी या गावांतील नाल्यांना पूर आल्यामुळे गावांचा तब्बल १८ तास संपर्क तुटला होता, तर गोरेगाव येथील कोराडी नाल्याने आणि जितापूर खेडकर येथेही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना अनेकतास वाट पाहावी लागली. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा मिटली असून, तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला.
------------------
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती हा एक आशेचा किरण असतो. पोळ्याच्या दिवशी आलेल्या पुरामुळे माझ्या सर्व जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो रुपये शेतीवर खर्च करून शेवटी हातात काहीच मिळाले नाही. झालेल्या संपूर्ण नुकसानीचा शासनाकडून मोबदला मिळावा.
- अतुल आंबेकर, शेतकरी शेलू बाजार
----------------
लाखपुरी मतदारसंघात नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व पुराच्या वेढ्यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक गावात अडकून पडले आहेत. त्यांची तातडीने मदत व पर्यायी व्यवस्था करावी.
- अप्पूदादा तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य
---------------
मूर्तिजापूर तालुक्यातील ऐंडली, पिंगला, झिंगला, खापरवाडा, लोनसणा, ताकवाडा, सोनोरी, बपोरी, गुंजवाडा, दातवी, गोरेगाव, समशेरपूर, गाजीपूर दताळा, भटोरी, मंगरुळ कांबे, या परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली आली तर यातील काही पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.