व्यवसाय कर न भरणा-यांच्या यादीत अकोल्यातील शेकडो वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 02:50 AM2016-09-27T02:50:08+5:302016-09-27T02:50:08+5:30
शेकडो वकिलांकडून लक्षावधी रुपयांचा कर वसूल करण्यासाठी व्यवसाय कर अधिका-यांचा प्रयोगांना अद्याप यश आले नाही.
अकोला, दि. २६- व्यवसाय कर न भरणार्यांच्या प्रतीक्षा यादीत अकोल्यातील जवळपास आठशे वकिलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला बार असोसिएशनचे सदस्य असलेल्या शेकडो वकिलांकडून लक्षावधी रुपयांचा कर वसूल करण्यासाठी आता व्यवसाय कर अधिकारी विविध प्रयोग करीत असले तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही.
सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर पेचातून सोडविण्यासाठी वकील तरबेज असतात; मात्र व्यवसाय कर भरणाच्या पेचात अकोल्यातील शेकडो वकिलच सापडले आहे. अकोला बार असोसिएशनचे सदस्य असलेले जवळपास अकराशे वकील कार्यरत आहे. लेबर कोर्ट, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, दिवानी आणि फौजदारी, सहकार न्यायालय आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या शेकडो वकिलांपैकी केवळ तीनशे वकिलांची नोंद व्यवसाय कर विभागात आहे. उर्वरित अनोंदित वकिलांची नोंद करण्यासाठी विक्री कर विभागाकडून अनेक वर्षांंंपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. व्यवसाय कर भरण्याबाबत विक्री कर विभागाने अनेकदा अकोला बार असोसिएशनच्या सहकार्याने कार्यशाळा घेतली. समुपदेशन वर्ग घेतलेत. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ज्ञ याप्रकरणी अपीलमध्ये गेले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाचे कर भरण्याचे आदेश कायम ठेवल्याने आता वकिलांसमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता वकिलांनी व्यवसाय कराचा भरणा न केल्यास त्यांना व्यवसाय कर अधिकारी सर्वसामान्यांना जशा नोटीस पाठवितात, तशा नोटीस पाठवितात काय, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.
अकोला बार असोसिएशनच्या शेकडो वकिलांनी सप्टेंबर अखेरपर्यंंंत असलेल्या अभय योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. मागील तीन वर्षांंंंची नोंद करून कर भरणाची प्रक्रिया नियमित करणे शक्य आहे. याबाबत अनेकदा अकोला बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी चर्चा झाली आहे. बार असोसिएशनच्या कार्यालयात ऑनलाइन यंत्रणा उभारणे अशक्य आहे.
- शीतल राजुरकर,
व्यवसाय कर अधिकारी, अकोला.
ऑनलाइन व्यवसाय कर भरणाची प्रक्रिया किचकट असून त्याचा भरणा करणे सदस्यांना जमलेले नाही. अकोला बार असोसिएशनने व्यवसाय कर भरणासाठी एका न्यायालय परिसरात कर भरणाची व्यवस्था करण्याची मागणी वारंवार केली आहे. त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. बार असोसिएशनच्या बैठकांतूनदेखील याबाबत वारंवार सांगितले गेले आहे. यातून मार्ग काढला पाहिजे.
- अँड. श्याम खोटरे,
अध्यक्ष, अकोला बार असोसिएशन