शेकडो मोबाइलधारकांची फसवणूक!
By Admin | Published: April 14, 2017 02:26 AM2017-04-14T02:26:39+5:302017-04-14T02:26:39+5:30
अकोला: मोबाइल विमा काढण्याच्या नावाखाली मुंबईच्या कंपनीने जिल्ह्यातील शेकडो मोबाइलधारकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे.
कार्यालय बंद: विमा काढण्याचे प्रलोभन; न्यायालयाकडे तक्रार
अकोला: मोबाइल खरेदी केल्यानंतर त्याचा विमा काढण्याच्या नावाखाली मुंबईच्या अॅप डेली कंपनीने जिल्ह्यातील शेकडो मोबाइलधारकांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अॅप डेली नावाच्या नावाखाली वर्षभरातच अकोल्यातील कार्यालय गुंडाळून पोबारासुद्धा केला. यासंदर्भात पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांनी अॅप डेली कंपनीच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
दररोज शेकडो व्यक्ती बाजारातून विविध कंपन्यांचे मोबाइल विकत घेतात. मोबाइल विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांमध्ये विमा कंपन्याचे एजंट कार्यरत असतात. मोबाइल घेतल्यावर हजार, पंधराशे रुपयांचा विमा काढून ग्राहकाला मोबाइलची तुटफूट झाल्यास, तांत्रिक बिघाड किंवा चोरी झाल्यास, दहा दिवसांच्या आता मोबाइल बदलून मिळेल किंवा दुरुस्ती करून मिळेल, असे आमिष दाखवितात आणि मोबाइल पूर्णत: निकामी झाल्यास मोबाइलची पूर्ण किंमत, दुरुस्तीचा खर्च देण्याचेही आमिष दाखवितात. विमा एजंटांच्या भुलथापांना बळी पडून अनेक जण मोबाइलचा विमा काढतात. असाच प्रकार पंचशील नगरात राहणारे श्यामसुंदर गुप्ता यांच्यासह अनेक ग्राहकांसोबत घडला. गुप्ता यांनी ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल खरेदी केल्यानंतर तेथील एका एजंटकडून १,२४५ रुपयांचा विमा काढला. यावेळी एजंटने त्यांचे कार्यालय जैन मंदिराजवळ असल्याचे त्यांना सांगितले आणि काही अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधण्यासही सांगितले. दरम्यान, गुप्ता यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. आणि त्यासंबंधीचे कागदपत्र घेऊन अॅप डेली कंपनीचे कार्यालय गाठले; परंतु त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर येथील कार्यालय बंद झाल्याचे त्यांना कळले. याठिकाणी आणखी मोबाइलधारकसुद्धा आलेले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुप्ता यांच्यासह आणखी काही मोबाइलधारकांनी अॅड. शेषराव गव्हाळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. अॅप डेली विमा कंपनीने गुप्ता यांचीच नाहीतर शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
उदंड झाल्या विमा कंपन्या
मोबाइल क्षेत्रातही शेकडो विमा कंपन्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक मोबाइल शोरूममध्ये या विमा कंपन्यांचे एजंट बसलेले असतात. शोरूम मालकसुद्धा ग्राहकांना मोबाइलचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. ग्राहकाने सहमती दर्शविल्यानंतर त्यांना विमा एजंटकडे नेल्या जाते आणि एजंट मोबाइलचा विमा काढून देतो.