शेकडो हेक्टर सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!
By रवी दामोदर | Published: July 19, 2023 01:55 PM2023-07-19T13:55:33+5:302023-07-19T13:55:54+5:30
या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली.
अकोला : जिल्ह्यात पेरणी सुरू असतानाच बियाणे उगविले नसल्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सातही तालुक्यांतून बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत असून, दि.१८ जुलैपर्यंत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या ५० लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित भरपाई देण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. यात सर्वाधिक तक्रारी ‘महाबीज’च्या बियाण्यांसंदर्भात असल्याचे समजते.
या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सार्वत्रिक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला. आता खरिपाची पेरणीदेखील अंतिम टप्प्यावर असून, सोयाबीन पेरणीने सरासरीचा टक्का ओलांडला आहे. अशातच सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांनी महाबीज व अन्य कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली.
यामध्ये महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता दोन टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे कृषी व पीकेव्हीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुकानिहाय तक्रारी
पातूर - १९
अकोला - ४
तेल्हारा - ४
बाळापूर - ६
बार्शीटाकळी - १०
मूर्तिजापूर - ४
अकोट - ३
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कृषी विभाग, पीकेव्हीचे अधिकारी यांचे पथक सदर प्लॉटचे पंचनामे करीत आहेत. उगवणक्षमता कमी आढळल्यास त्याच बियाण्यांचे आणखी प्लॉट तपासल्या जातात. बियाणे उगविले नसल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक स्तरावर कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा तक्रार निवारण कक्षात भेट द्यावी.
महेंद्र सालके, कृषी विकास अधिकारी, जि.प., अकोला