भाजपला ‘शत-प्रतिशत’ची घाई!

By admin | Published: July 8, 2017 02:35 AM2017-07-08T02:35:29+5:302017-07-08T02:35:29+5:30

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे शरसंधान

Hundreds of percentages of the BJP! | भाजपला ‘शत-प्रतिशत’ची घाई!

भाजपला ‘शत-प्रतिशत’ची घाई!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय जनता पक्षाला ‘शत-प्रतिशत’ची घाई झाली आहे. त्यामुळेच हा पक्ष महायुतीतील घटकपक्षांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी अकोला येथे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी अकोला येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाजप घटकपक्षांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका केली. भाजपाला शत-प्रतिशतची घाई झाली आहे, त्यामुळे या पक्षाचे नेते महायुतीतील छोट्या पक्षांना गृहीत धरतात. जागा वाटपांमध्ये छोट्या पक्षांवर अन्याय होत असल्यामुळे महायुतीतील छोटे पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र निवडणुका लढविताना दिसतात. गतवेळी विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडण्याचा भाजपच्या केंद्र व राज्यपातळीवरील नेतृत्वाकडून घेण्यात आला होता.
या मतदारसंघातून संदीप लोड यांना एबी फॉर्मही मिळाला होता; परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे तिकीट कापून केवळ आमचाच नव्हे, तर भाजपच्या राष्ट्रीय व राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोपही यावेळी आमदार मेटे यांनी केला.
पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड यांच्यासह नानासाहेब भिसे, पांडुरंग खवले, विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड रासपचे संतीश हांडे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री सर्वांना सांभाळणारे !
एकीकडे भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करीत असल्याची टीका करणाऱ्या मेटे यांनी दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वपक्षातील नेत्यांसोबतच महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांना सांभाळून घेतात. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागते असे मेटे म्हणाले.

स्थानिक भाजप नेत्यांनीच केला विश्वासघात!
गत विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्रामसाठी बाळापूर मतदारसंघ सोडण्यात आला होता. या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या संदीप पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र एबी फॉर्ममध्ये खोडखाड करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे नाव टाकले. या नेत्यांनी आमचाच नव्हे, तर तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका यावेळी विनायकराव मेटे यांनी केली.

बाळापूरवरचा हक्क सोडणार नाही!
विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीत कायम राहण्याचे स्पष्ट करतानाच, अकोला जिल्ह्यातून एक तरी आमदार शिवसंग्रामचा नक्कीच निवडून आणणार, असा विश्वास आ. मेटे यांनी यावेळी व्यक्त केला. बाळापूरवरचा हक्क शिवसंग्राम कदापिही सोडणार नाही. ंमहायुती होवो अगन ना होवो, हा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सुटो अथवा ना सुटो, त्या ठिकाणी आगामी निवडणुकीत शिवसंग्रामचा उमेदवार उभा राहीलच. कोणत्याही ‘सोम्या-गोम्या’चे आम्ही ऐकणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Hundreds of percentages of the BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.