परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी ताटकळत बसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:09 AM2017-09-08T02:09:08+5:302017-09-08T02:09:08+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी राबविण्यात येते. गुरुवारी झालेल्या या परीक्षेचे नियोजन नसल्याने पातूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ताटकळत बसावे लागले. पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी राबविण्यात येते. गुरुवारी झालेल्या या परीक्षेचे नियोजन नसल्याने पातूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ताटकळत बसावे लागले. पातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसला.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, तर इयत्ता नववीसाठी नैदानिक चाचणी घेण्यात येते. यामध्ये भाषा, गणित आणि विज्ञान या विषयाचे पेपर महाराष्ट्रात एकाचवेळी घेण्याचा आदेश आहे. त्यानुसार सन २0१७-१८ या शैक्षणिक सत्रातील परीक्षेच्या तारखा शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. यातील पहिली पायाभूत व नैदानिक चाचणी ७ सप्टेंबर रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार या चाचण्यांचे संपूर्ण साहित्य ७ सप्टेंबरपूर्वी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. परंतु पातूरच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळांपर्यंत हे साहित्य गुरुवारी दुपारपर्यंत पोहोचलेच नाही, तर अनेक शिक्षकांना शिक्षक मार्गदर्शिकाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे नेमकी परीक्षा घ्यावी कशी? याबाबत अनेक शिक्षकांचा संभ्रम कायम होता. त्यामुळे अनेक शाळांना पेपर भेटूनही विद्यार्थ्यांचे पेपर कसे घ्यावे, यासंदर्भात संभ्रम असल्याने विद्यार्थ्यांना दुपारी उशिरापर्यंंत ताटकळत बसावे लागल्याची बाब समोर आली. या संदर्भात संबंधित साधन व्यक्ती व पातूरच्या गटशिक्षण अधिकार्यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल आऊटऑफ कव्हरेज एरिया असल्याचा संदेश मिळत असल्यामुळे त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
पेपर व परीक्षेचे साहित्य पडले बेवारस
- परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी संतोष राठोड साधन व्यक्ती या कर्मचार्याकडे देण्यात आली होती; परंतु या कर्मचार्याने जि.प. मधून आणलेले संपूर्ण पेपर पातूरच्या जि. प. शाळेत बेवारस स्थितीत ठेवल्याचा आरोप होत आहे. एका वर्गखोलीत पेपर ठेवून बेवारस स्थितीत असल्याने अनेक शाळांना पेपर मिळालेच नाहीत, तर केंद्रप्रमुखांनाही पेपर व साहित्य मिळाले नसल्याने शिक्षण विभागात गुरुवारी दुपारपर्यंत गोंधळ सुरू होता. जि.प. च्या शाळेत ठेवलेले साहित्य बेवारस पडून असल्याने अनेक शिक्षकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पेपरसंच व साहित्य नेल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
- अशा नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांंना बसला. दुपारी उशिरापर्यंंत अनेक शाळांना पेपर नाही, तर कुठे मार्गदर्शिका नाहीत, असा गोंधळ सुरू होता, तर अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी झेरॉक्स काढून पेपर घेतले, तर काहींना अकोला जाऊन पेपर व संच घेऊन येण्याचा सल्ला देण्यात आला. अशा नियोजनशून्य कारभार करणार्या संबंधित कर्मचार्यावर कारवाई होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.