शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांवर उपासमारीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:20 PM2020-04-13T17:20:43+5:302020-04-13T17:20:51+5:30

लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.

Hunger Crisis on Poor Families who dont have rationcards | शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांवर उपासमारीचे संकट!

शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांवर उपासमारीचे संकट!

googlenewsNext

- संतोष येलकर

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’ मध्ये शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येत असले तरी, शिधापत्रिका नसलेल्या अनेक गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आणि शिधापत्रिका नसलेल्या गरीब मजूर कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रत्येक लाभार्थीला ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारक ( एपीएल) लाभार्थींनादेखील मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अनेक गरीब मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत हाताला काम नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत पोटाची खळगी भरणार कशी, याबाबतची चिंता गरीब मजूर कुटुंबांना सतावत आहे.


जिल्ह्यातील ज्या गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून पात्र लाभार्थी कुटुंबांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.
- बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी
 

 

 

Web Title: Hunger Crisis on Poor Families who dont have rationcards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला