लंघापूरच्या आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 06:33 PM2019-06-29T18:33:37+5:302019-06-29T18:46:26+5:30
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मूर्तिजापूर(अकोला) : उमा बॅरेज प्रकल्पात गेलेल्या लंघापूर या गावाच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन दिले; मात्र या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी मूर्तिजापूर तहसीलसमोर २७ जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसºया दिवशी आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
उमा बॅरेज प्रकल्पामध्ये जात असलेल्या लंघापूर गावाच्या पुनर्वसनाचे काम २००९ पासून म्हणजे १० वर्षांपासून प्रलंबित आहे. गावाचे पुनर्वसन होणार असल्याने ग्रामस्थांनी १० वर्षांपासून घरांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची घरे शिकस्त झाली असून, अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. यंदाच्या पावसाळ्यात अनेक घरे पडण्याच्या स्थितीत असून, त्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच ५-५ वर्षांपासून गावाची विकासाची कामे पूर्णपणे बंद आहेत, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात बाबाराव पाटील पाचडे, श्याम पाचडे, अशोक पाचडे, सिद्धार्थ सदाशिव, सरदार शा, बुरान शा, याकुब शा, रंगराव खराते, रूपाली पाचडे, भीमराव पाचडे, शरद वानखडे, किसन शेळके, लीला खराते, सुनीता मेश्राम, गोकर्णाबाई वानखडे, सुशीला पवार, राधा आमटे, उर्मिला वाघमारे, सुमनबाई गावंडे, इंदुबाई गावंडे, कासम शा, धुर्पता माहोरे, गफ्फार शा, महादेव वानखडे आदींनी सहभाग घेतला आहे. शनिवारी उपोषणकर्त्यांपैकी अजाब गायकवाड , गोवर्धन गायकवाड, सुनीता मेश्राम, इंदुबाई गवई, उर्मिला वाघमारे , शोभा मोरे , मैना वरघट , सुमन गावंडे यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)