वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:09 PM2020-03-30T17:09:28+5:302020-03-30T17:10:57+5:30
शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे अचानक आलेल्या वादळामुळे शेतमजुराचा घर कोसळल्याची घटना रविवारी २९ मार्च रोजी रात्री १२ वाजता घडली. या घटनेमध्ये शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.त्यामुळे, त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
पिंपळखुटा परिसरात रविवारी रात्री वादळासह अवकाळी पाउस झाला. वादळामुळे मंगेश मालोकार यांचे घर उद्धवस्त झाले. घराचे दोन दरवाजे, पंखा, टीव्ही,मोबाईल, टिन पत्रे, आदि साहित्याचे नुकसान झाले. तसेच घरातील गहू, तूर, डाळ, व इतर घरगुती साहित्य भिजल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंगेश मालोकार यांचा संसार उघड्यावर आला आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. घटनेची माहिती मिळताच पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या आदेशानुसार तलाठी एस. बी. भराळी, जी. व्ही. लाड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. मालोकार यांना प्रशासनाने तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कोरोमुळे मदतीत अडथळा
कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी सुरू असल्याने कुटुंबाजवळ कोणीही जायला तसेच मदत करायला तयार नाही. त्यामुळे मंगेश मालोकार यांच्यासमोर जीवन जगण्यासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
तहसीलदारांच्या आदेशानुसार पंचनामा केला असून, अहवाल तहसील कार्यालयात सादर करू.मालोकार यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
एस. बी. भराळी, तलाठी