कूलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील घटना
By रवी दामोदर | Published: July 31, 2023 04:18 PM2023-07-31T16:18:40+5:302023-07-31T16:18:56+5:30
अकोला : घरामधील कूलरचा शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली. ...
अकोला : घरामधील कूलरचा शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली.
महान येथील प्रभाकर बापूराव जनोरकार (७०) व त्यांची पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (६५) वर्ष हे पाटील पुऱ्यात वास्तव्यास होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी ४ वाजता प्रभाकर जानोरकार हे शेतातून काम करून घरी परतले असता त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांची पत्नी कूलरच्या पाठीमागे खाली पडलेली दिसली. त्यांच्या पत्नीला नेहमी चक्करचा आजार असल्याने तिला चक्कर आल्यामुळे ती खाली पडली असावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी उदय जानोरकार व आशिष पोफळे यांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तुटत नसल्याने त्यांनी घरामागील दरवाजामधून आत प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कूलरच्या समोरून जात असताना त्यांच्या हाताचा कूलरला स्पर्श झाल्याने त्यांना सुद्धा विद्युत शॉक लागला. यावेळी त्यांनी जोरात ओरड मारली.
यावेळी खिडकीतून पाहत असलेले आशिष पोफले व उदय जानोरकार यांच्या लक्षात आले की कूलरमध्ये शॉक आहे. त्यांनी लगेच घराबाहेरील मीटरजवळ जाऊन त्यावर काठीने मारा केला. परंतु, वीज प्रवाह खंडित झाला नाही. शेवटी सर्व्हिस लाईनवर काठीने मारल्याने वीज प्रवाह बंद झाले. त्यानंतर नागरिकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत ते दोघेही ठार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल वाघ, पीएसआय बंडू मेश्राम, महान पोलिस चौकीचे जमादार बेलूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.