दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार
By नितिन गव्हाळे | Published: May 18, 2023 06:32 PM2023-05-18T18:32:10+5:302023-05-18T18:32:31+5:30
या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोला : पत्नी दिसायला सुंदर नाही, तिला कामधंदा येत नाही, यावरून पती दारू पिऊन सतत शारीरिक व मानसिक छळ करतो. त्याच्या छळाला कंटाळून पत्नीने मूर्तिजापूर शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मूर्तिजापूर माहेर असलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुले असून, तिचे लग्न २०१३ मध्ये येळाबारा, ता. वडगाव, जि. यवतमाळ येथील श्यामसुंदर दयाल प्रजापती याच्यासोबत झाले.
लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर पती दररोज घरी दारू पिऊन यायचा. शिवीगाळ करून मारहाण करायचा आणि तू दिसायला सुंदर नाही. तुला कामधंदा येत नाही, असे म्हणत, छळ करायचा. मुले असल्याने, विवाहिता त्याचा छळ सहन करायची. पती सतत चारित्र्यावर संशय घेतो आणि माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावतो. दुचाकी मागितली असता, विवाहितेच्या वडिलांनी त्याला नवीन दुचाकी घेऊन दिली. त्यानंतरही पती सतत वाद घालून छळ करतो. वर्षभरापूर्वी पती श्यामसुंदर प्रजापती याने विवाहितेला घरातून हाकलून दिले. या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.