चारित्र्यावर संशय असल्याने, पतीने केली पत्नीची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 07:50 PM2017-11-24T19:50:10+5:302017-11-24T20:07:27+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यात वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निघरुण हत्या केली. सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीस अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यात वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निघरुण हत्या केली. सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीस अटक केली.
कृषी नगर परिसरातील न्यू भीम नगरात राहणारे गजानन सोनाजी तायडे(५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रमेश सोनाजी तायडे आणि कविता तायडे हे दोघे पती-पत्नी असून, त्यांना एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. रमेश हा गवंडी काम करायचा. त्याला दारुचे व्यसन आहे. रमेश तायडे हा त्याची पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घ्यायचा आणि कोणत्याही पुरुषाकडे संशयाने पाहायचा. काही व्यक्तीविरुद्ध तो नेहमीच पत्नीला पोलिसात तक्रार देण्यास सांगायचा; परंतु पत्नी त्याला नकार द्यायची. गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्वांनी भोजन घेतल्यानंतर सर्व झोपी गेले. मुलगा जय(१६)याला तहान लागल्यामुळे तो पहाटेच उठला. त्याला पाणी देण्यासाठी कवितासुद्धा झोपेतून उठली. तिने मुलाला पाणी दिले. आरोपी रमेश तायडे हा सुद्धा जागा झाला. मुलगा रनिंग करण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पती रमेशने कवितासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात रमेश तायडे याने पत्नी कविताच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घातला. यानंतरही त्याने पाट्याने कविताच्या डोक्यावर तीन ते चार वेळा वार केले. जबर मारामुळे कविता जागीच गतप्राण झाली. घरात झोपलेल्या मुलीने हा प्रकार पाहिल्यावर शेजारी राहणारे मोठेबाबा गजानन तायडे यांना माहिती दिली. त्यांनी घरात येऊन पाहिल्यावर कविता रक्ताच्या थारोळय़ात पडली होती. गजानन तायडे यांनी सिव्हिल लाइन पोलिसांना तातडीने माहिती दिल्यावर ठाणेदार अन्वर शेख घटनास्थळावर हजर झाले. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनीसुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी आरोपी रमेश तायडे याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला.
रमेश तायडे हा मानसिक रुग्ण?
आरोपी रमेश तायडे याचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार घेत असताना, तो कोमामध्ये होता. त्यातून तो बरा झाला; मात्र मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने, कुटुंबियांसोबत तो विचित्र वागायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिला कोणत्याही पुरुषाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार द्यायला सांगायचा, अशी माहिती पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आली.