पत्नीचा छळ करणा-या पतीस सहा महिने शिक्षा
By admin | Published: August 6, 2016 01:58 AM2016-08-06T01:58:15+5:302016-08-06T01:58:15+5:30
सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा; एक हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला.
अकोला, दि. ५: सिंधी कॅम्प येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक आणि मासनिक छळ करून तिला मारहाण करणार्या पतीला प्रथम श्रेणी न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला आहे.
पक्की खोली परिसरातील रहिवासी कौशल्या ऊर्फ भारती बलराम बलवानी यांची भारती ही तिसरी पत्नी असून बलराम याच्या पहिल्या आणि दुसर्या पत्नीचा मृत्यू झाला. तर तिसरा विवाह कौशल्या हिच्यासोबत १९९८ मध्ये झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली; मात्र काही दिवसातच या दोघांमध्ये वाद सुरू झाले. बलराम बलवानी हा त्याची पत्नी कौशल्य हिला विनाकारण मारहाण करीत असे, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. ३0 सप्टेंबर २0१२ रोजी बलराम बलवानी याने कौशल्याला लाथा-बुक्क्यांनी तसेच फायटरने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाची तक्रार तिने खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी बलराम बलवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ आणि ५0६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदान पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोषारोपपत्र प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहिनी ननवारे यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचे पाच साक्षीदार तपासले. यामध्ये त्याची पीडित पत्नी कौशल्या आणि मुलीचे बयान महत्त्वाचे ठरले. बलराम बलवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ नुसार समोर आलेल्या ठोस पुराव्याववरून न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली तर १ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यासोबतच कलम ५0६ अन्वये एक महिन्याची शिक्षा न्यायालयाने आरोपीस सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहिले.