पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:44+5:302021-09-09T04:24:44+5:30
अकोला: जिल्ह्यातील मधापुरी येथे दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी पतीला ...
अकोला: जिल्ह्यातील मधापुरी येथे दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी पतीला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत, १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्णय न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिला.
माना पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मधापुरी येथे १८ मार्च, २०१५ रोजी दारूच्या नशेत आरोपी संतोष मधुकर कुरडकर याने पत्नी रेखा हिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटून दिले होते. दारूच्या नशेत हा प्रकार केल्यानंतर, आरोपीला शुद्ध येताच, विपरित घडल्याचे लक्षात आले. त्यानंतर, आरोपीने शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीला लागलेली आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत पत्नी रेखा ही ९६ टक्के जळाली होती. त्यामुळे आरोपीने पत्नीला तातडीने रुग्णालयात भरती केले. या घटनेची माहिती माना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी संतोष मधुकर कुरडकर विरोधात भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान पत्नी रेखाचा मृत्यू झाल्याने कलम ३०३ दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत ८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३०७, ३०२, ४९८ अ च्या आरोपातून मुक्त केले, तर कलम ३०४ पार्ट २ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.