गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

By नितिन गव्हाळे | Published: July 11, 2024 10:23 PM2024-07-11T22:23:13+5:302024-07-11T22:23:51+5:30

अंत्यसंस्कारासाठी नेत असताना पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाली घटना

Husband sentenced to life imprisonment for strangling pregnant wife An important decision of the court | गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

नितीन गव्हाळे, अकोला: घरगुती वादातून गर्भवती पत्नीची गळा दाबून १६ सप्टेंबर २०२० रोजी निर्घुण हत्या करणारा आरोपी पती राजेश भास्कर ठाकरे (३८), रा. समर्थ नगर, पातूर याला ११ जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांनी भादंवि कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कलमांनुसार शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी राजेश भास्कर ठाकरे हा १६ सप्टेंबर २०२० रोजी पातूर येथून त्याच्या कारमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह घेवून त्याचे मुळगावी चौंडी येथे अंत्यविधीकरीता गेला होते. परंतु अंत्यविधी करण्यास गावातील नागरीक राजी न झाल्याने तो पत्नीचा मृतदेह घेवून पातूर किंवा अकोलाच्या रस्त्याने निघाल्याची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मळसूर फाटा येथे नाकाबंदी करून पिंपळडोळी मार्गे आलेली कार थांबविली आणि चौकशी केली असता कारमधील मागील सिटवर एक माहिला निपचित अवस्थेत पडली असल्याचे दिसले.

आरोपी राजेश ठाकरे याने सिरीअस पेशंट आहे, अकोला येथे नेत असल्याचे पाेलिसांना सांगितले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, कारमधील त्याची पत्नी वर्षा राजेश ठाकरे ही असून, तिने घरगुती वादातून गळफास घेतल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. परंतु आरोपीच्या बोलण्यावरुन व हावभावावरुन शंका आल्याने पोलिसांनी मृत महिला तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, चतारी येथे नेते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मृत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सर्वोपचार रूग्णालयात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

शवविच्छेदनात तिचा मृत्यु हा गळा आवळल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. इतर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी राजेश भास्कर ठाकरे याला भादंवि ३०२ अंतर्गत दोषी ठरवुन सश्रम जन्मठेपेची शिक्षा व १० हजार दंड ठोठावला. तसेच भादंवि ३१५अंतर्गत दोषी ठरवुन सश्रम ७ वर्षांची शिक्षा, १० हजार रूपये, दंड, भादंवि कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवुन ३ वर्ष सश्रम कारावास, १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष सश्रम कारावाची शिक्षा ठोठावली.

सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी बाजु मांडली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्ष रत्नपारखी यांनी केला. तसेच पैरवी अधिकारी एएसआय. उकंडा जाधव, रत्नाकर बागडे यांनी सहकार्य केले.

घरगुती वादातून केली पत्नीची हत्या

आरोपी राजेश ठाकरे याला पोलिस स्टेशन चान्नी येथे बोलावून चौकशी केली असता, त्याची पत्नी ४ ते ५ महिन्यांची गर्भवती होती व आरोपीचे तिच्यासोबत वारंवार भांडणे होत होते. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी आरोपीविरुध्द चान्नी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१, ४९८ अ ३१५ नुसार गुन्हा दाखल केला.

डॉक्टरची साक्ष ठरली महत्वाची

या प्रकरणामध्ये मृतक पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सांगत, आरोपी राजेश ठाकरे याने बचाव केला होता. परंतु शवविच्छेदन करणारे सर्वोपचार रुग्णालय येथील डॉ. सचिन गाडगे यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यांनी वर्षा ठाकरे हिचा गळा दाबल्याने, मृत्यू झाल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.

Web Title: Husband sentenced to life imprisonment for strangling pregnant wife An important decision of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.