ग्रा.पं.मधील भंगार महिला सदस्यांच्या पतींनी परस्पर विकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:33+5:302021-07-21T04:14:33+5:30
गायगाव : येथील सरपंचपतीसह चार महिला सदस्यांच्या पतींनी संगनमत करून ग्राम पंचायतमधील हजारो रुपयांचे भंगार परस्पर विकल्याचा प्रकार घडला ...
गायगाव : येथील सरपंचपतीसह चार महिला सदस्यांच्या पतींनी संगनमत करून ग्राम पंचायतमधील हजारो रुपयांचे भंगार परस्पर विकल्याचा प्रकार घडला आहे. भंगार विकून मिळालेले पैसे ग्राम पंचायत खात्यात न टाकता पैशांचा अपहार केल्याचा आरोप करीत विरोधी गटातील पाच सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून महिला सरपंच व त्या महिला सदस्यांना अपात्र करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
विरोधी गटातील ग्रा.पं. सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महिला सरपंचपती संजय वानखडे, सदस्य पती हरिभाऊ ढोक, ज्ञानेश्वर भिवटे, हबीब खान, गोरख खेतकर यांनी संगनमत करून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत महिलांच्या पदाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायतीमधील हजारो रुपयांचे भंगार कार्यालयाचे कुलूप उघडून परस्पर विकले. त्यामुळे विरोधी गटाचे ग्रा.पं. सदस्य स्वराज दिलीप थोटे, दिलीप वामनराव थोटे, प्रवीण रामदास खेतकर, वसंत रामराव आगरकर, अंतकला श्रीकृष्ण वानखडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून संबंधित दोषींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत, तसेच कार्यालयीन चौकशी करून त्या महिला सदस्यांचे व सरपंचाचे पद त्वरित रद्द करावे, अशी मागणी तक्रारीतून केली आहे.
----------------------------
अधिकार नसताना बेकायदेशीररीत्या भंगाराची विक्री महिला सदस्यपतींनी केली असून, माझ्या अनुपस्थितीत हा प्रकार घडला आहे. दि. २२ जून रोजी घटनेच्या दिवशी मी सुटीवर होतो. या भंगार प्रकरणाची माहिती ग्राम पंचायत कर्मचाऱ्याकडून लेखी स्वरूपात अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
-एस. एस. धुळे, ग्रामविकास अधिकारी, गायगाव.
-----------------------
सरपंच, सदस्य पतींनी अधिकार नसताना ग्राम पंचायतीमध्ये जाऊन शासकीय मालमत्तेची परस्पर विक्री करून पैशांचा अपहार केला. या प्रकरणाची रीतसर तक्रार दाखल केली आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होईपर्यंत गप्प बसणार नसून, उपोषणास बसण्याची तयारी आहे.
-दिलीप थोटे, सदस्य, ग्रा. पं. गायगाव.
------------------------------
अंदाजे ७० हजार रुपयांचे विकले भंगार!
भंगार विक्रीची अंदाजे रक्कम ७० हजार रुपयांच्या जवळपास आहे. भंगार विक्रीतून मिळालेली रक्कम सदस्य पतींनी स्वतःच्या कामासाठी वापरल्याचा आरोप तक्रारीत आहे. ही रक्कम ग्राम पंचायतीच्या खात्यात अद्यापही जमा करण्यात आली नाही. भंगार विक्रीची परवानगी जिल्हा परिषदेकडून मागून ठराव, दवंडी, जाहिरात व सरपंच, ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हर्रासी अशी प्रक्रिया आहे. मात्र, येथील ग्राम पंचायतीमधील भंगार परस्पर विकले आहे.