हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर विशेष रेल्वे डिसेंबरअखेरपर्यंत धावणार
By Atul.jaiswal | Published: September 27, 2023 01:47 PM2023-09-27T13:47:08+5:302023-09-27T13:48:19+5:30
दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष गाड्यांपैकी दोन गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला
अकोला : आगामी सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गे धावणऱ्या हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-बिकानेर या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना डिसेंबरअखेर व जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या या गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवासी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर व ओखा-मदुराई या तीन उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत संपत आहे. अकोलामार्गे असलेल्या या गाड्यांच्या आता केवळ एक-एक फेऱ्या शिल्लक असताना दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आली नव्हती. या गाड्यांना मुदतवाढ मिळाली नसती तर दसरा, दिवाळी व नाताळाच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला असता. प्रवाशी संघटनांच्या मागणीची दखल घेत रेल्वेने हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर गाड्यांना डिसेंबरअखेरपर्यंत सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.
गाडी क्र. - कधीपर्यंत मुदतवाढ
०७११५ हैदराबाद - जयपुर : २९ डिसेंबर २०२३
०७११६ जयपुर - हैद्राबाद : ३१ डिसेंबर २०२३
०७०५४ बीकानेर - काचीगुडा : २ जानेवारी २०२४
०७०५३ काचीगुडा - बिकानेर : ३० डिसेंबर २०२३
ओखा-मदुैर-ओखा एक्स्प्रेसला मुदतवाढ कधी?
दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष गाड्यांपैकी दोन गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी ओखा-मदुैर-ओखा एक्स्प्रेसला अद्यापही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ०९५२० ओखा - मदुरै एक्स्प्रेसची मुदत २५ सप्टेंबरला संपली असून, ०९५१९ मदुरै - ओखा एक्स्प्रेसची मुदत २९ सप्टेंबरला संपणार आहे. या गाडीला कधी मुदतवाढ मिळते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.