२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात देशसेवेची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:24+5:302021-08-15T04:21:24+5:30
अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या ...
अकोला : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नाही, पण प्रत्यक्ष सीमेवर देशाच्या रक्षणाचं सौभाग्य मिळालं... स्वातंत्र्य, सार्वभौम भारतावर मुंबई येथे झालेल्या २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन देशवासीयांचे रक्षण करण्याचं सौभाग्य मिळालं... याचा मला सार्थ अभिमान आहे... युवकांनी सैन्यात दाखल व्हावं, पण नोकरी म्हणून नाही, तर देश सुरक्षेसाठी, सैनिक म्हणून जगण्यासाठी, असं मत माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केलं.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशावर अनेक संकटं आलीत, मात्र सैन्याने ताकदीने ही संकटे परतवून लावलीत. देशसेवेचे असेच काही आठवणीतले अनुभव माजी सुभेदार मेजर वसंत सरकटे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय) आणि मुंबई येथील २६/११ आतंकवादी हल्ल्यात सैनिक म्हणून देशसेवेचा त्यांचा अनुभव व्यक्त केला. कारगिल युद्धावेळी ते राजस्थान बॉर्डरवर तैनात हाेते. येथे प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता आले नसले, तरी संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी तब्बल तीन महिने डोळ्यात तेल घालून भारतीय सैन्याने बॉर्डरवर तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दिल्ली येथे एनएसजी कमांडरमध्ये कार्यरत असताना मुंबई येथील २६/११चा आतंकवादी हल्ला झाला. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे सौभाग्य मिळाले. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी नरिमन पॉइंट येथील हॉटेलवर हॅलिकॉप्टरने ड्रॉप झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एनएसजी कमांडरच्या तुकडीने दोन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर आम्ही ताज हॉटेलमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी ४० ते ५० लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लोकांनी गुलाबपुष्प देऊन आमचे स्वागत केले. पण या लढाईत आमचे मित्र हवलदार गजेंदर शहीद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
युवकांनो बलिदानाची मानसिकता ठेवा
तरुणाई नोकरीसाठी आर्मीमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहते, मात्र हे एक बलिदान आहे. तरुणाईने त्याकडे बलिदान म्हणून बघण्याची गरज आहे. देशाच्या रक्षणासाठी देशाचा सैनिक म्हणून जगण्याची गरज आहे. हा विचार तरुणाईच्या मनात रुजण्याची गरज आहे, तरच आपण देशाची खरी सेवा करू शकता.
- वसंत सरकटे, माजी सुभेदार मेजर, भारतीय आर्मी