सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:50 AM2021-07-22T10:50:30+5:302021-07-22T10:55:37+5:30
MAHABEEJ : गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
- सागर कुटे
अकोला : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. सौरभ विजय यांच्यानंतर गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हे पद आयएएस अधिकाऱ्यांना नको असल्याचे दिसून येत आहे. बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, विपणन व विक्री हे सर्व कार्य महाबीजमार्फत केले जाते. महाबीजचे मुख्यालय हे अकोल्यात असून या महामंडळाची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकाची असते. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. काही मोजके अधिकारी सोडता इतर अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले नाही. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. ते १७ फेब्रुवारीला रुजू झाले; परंतु अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली. तेही महिनाभरानंतर रुजू झाले. तीन महिन्यांतच रेखावार यांची बदली झाली. त्यामुळे या पदाबाबत असलेली उदासीनता पुन्हा दिसून आली.
असा आहे महाबीजमध्ये अधिकाऱ्यांचा कार्यकाळ
महाबीजच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३२ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक करण्यात आली. टी. बालारमण महाबीजचे पहिले एमडी होते. त्यानंतर, व्ही. रंगनाथन हे एमडी झाले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, एमडीपदावर बहुतांश अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाहीत.
शासनाकडून दुर्लक्षित
नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नापसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे; मात्र शासनाकडूनही हे महामंडळ दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
सात-आठ वर्षांपासून एमडीपदावर अधिकारी टिकूनच राहत नाही. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वर्ण असलेल्या या महामंडळात एखादा एमडी म्हणून अधिकारी रुजू झाल्यास त्याला तीन वर्षांचा काळ पूर्ण करण्याची सक्ती केली पाहिजे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.
- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला
पद रिक्तच!
काही दिवसांआधी राज्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कुणाचीही नेमणूक झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे पद अधांतरी लटकले आहे. या पदावर अद्याप कोणाची नेमणूक होणार, याकडे लक्ष लागले आहे.