शिर्ला ग्रामपंचायतमध्ये पार पडला आदर्श विवाह; मंगलाष्टकांऐवजी कोरोनाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:02 PM2020-04-28T12:02:19+5:302020-04-28T12:03:03+5:30
मंगलाष्टकांऐवजी कोरोनाची शपथ देण्यात आली तर भेट म्हणून सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
- संतोषकुमार गवई
शिर्ला : कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा स्थितीत फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत शिर्ला ग्रामपंचायतमध्ये २७ एप्रिल रोजी आदर्श विवाह पार पडला. यावेळी मंगलाष्टकांऐवजी कोरोनाची शपथ देण्यात आली तर भेट म्हणून सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
शिर्ला येथील स्नेहल गजानन भाजीपाले हिचा विवाह लाखनवाडा येथील महेश मोहन इंगळे यांच्याशी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी सध्याची स्थिती पाहता ग्रामपंचायतमध्ये आदर्श विवाह करण्याचे ठरविले. त्यानुसार शिर्ला ग्रामपंचायतमध्ये २७ एप्रिल रोजी हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी भेटवस्तूच्या स्वरूपात ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी सॅनिटायझर आणि मास्क दिले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेला हा विवाह आगळावेगळा अनुभव ठरला. लाखनवाडा येथून मुलाचे वडील मोहन भिकाजी इंगळे, अरूण गोविंदा इंगळे , गणेश परसराम इंगळे , सुवर्णा उमेश निमकंडे विवाहासाठी शिर्ला ग्रामपंचायतमध्ये दाखल झाले. यावेळी वधू आणि वर पक्षाचे ग्राम विकास अधिकारी तथा कोरोना पथकप्रमुख राहुल उंद्रे यांनी सर्वांना मास्क आणि सॅनिटायझर लावल्यानंतर ग्रा.पं.कार्यालयात प्रवेश दिला. दालनात दाखल झाल्यानंतर नवरी नवरदेवाने एकामेकांच्या गळ्यात हार घालून अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर ग्रामपंचायतच्या विवाह नोंदणी पुस्तिकेत सह्यासह नोंद घेण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी कोरोनाचा बचाव करण्यासाठी सुचनांची अभिनव पद्धतीने नवदाम्पत्याला कोरोना प्रतिबंधात्मक शपथ दिली. यानंतर भेटवस्तू स्वरूपात सॅनिटायझरच्या बॉटल आणि मास्क भेट स्वरूपात देण्यात आल्या. मंगेश निमकंडे यांनी विवाहाचे संचालन केले. शहीद कैलास निमकंडे स्मारक समिती अध्यक्ष काशिराम निमकंडे यांनी विचार व्यक्त केले. वधूकडून संजय इंगळे, शुभम उगले, प्रल्हाद पातुरे यांनी मुलीची पाठवणी केली. कोरोना पथकातील सहायक ग्रामसेवक अक्षय गाडगे, प्रमोद उगले, हेमंत घुगे, संजय खर्डे, अंबादास इंगळे, सहदेव काळपांडे यांनी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.