रेल्वे देणार अपंगांना ओळखपत्र
By Admin | Published: June 2, 2015 01:32 AM2015-06-02T01:32:05+5:302015-06-02T01:32:05+5:30
ओळखपत्रावर राहणार यूनिक आयडी : इंटरनेटवरून बुक करता येईल तिकीट.
राम देशपांडे / अकोला : अपंगांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने लवकरच रेल्वे प्रशासन ओळखपत्र वितरित करणार आहे. या सुविधेमुळे ओळखपत्र प्राप्त अपंग व्यक्तींना तिकिटासाठी धक्के खात रांगेत उभे रहावे लागणार नाही. ओळखपत्रावर अंकित यूनिक आयडीच्या माध्यमातून त्यांना थेट इंटरनेटवरून तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. कुठल्याही कारणाने अपंगत्व आलेल्या व्यक्तींना रेल्वेने प्रवास करताना कुणाचा आधार घेण्याची गरज पडू नये, त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, हा उद्देश समोर ठेवून रेल्वे प्रशासन लवकरच अपंगांना ओळखपत्र वितरित करणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्या अपंग व्यक्तींना सध्याच्या घटकेला तिकीट काढताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. विविध मार्गांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे तयार करून अनेकजण रेल्वेची लुबाडणूक करीत असल्याची प्रकरणे प्रत्येक विभागात निष्पन्न झाली आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने लवकरच अपंग व्यक्तींना त्यांचा स्वत:चा फोटो व यूनिक क्रमांक असलेले ओळखपत्रे वितरित केली जाणार आहेत. ओळखपत्र प्राप्त करू इच्छिणार्या अपंग व्यक्तीच्या कागदपत्रांची पडताळणी विभागीय रेल्वे व्यस्थापकांमार्फत केली जाणार आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच अपंग व्यक्तीला त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे ओळखपत्र प्राप्त करण्याविषयीची सूचना दिली जाणार आहे. अपंगांना वितरित केल्या जाणार्या ओळखपत्राची वैधता पाच वर्ष राहणार असून, तिकीट काढण्यासाठी धक्के खात रांगेत उभे न राहता आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म न भरता यूनिक आयडी क्रमांकाद्वारे अपंग व्यक्तीस थेट इंटरनेटवरून तिकीट बुक करता येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. रेल्वेच्या चारही झोनमधील सर्व विभागीय व्यवस्थापकांना याबाबतच्या सूचना व निर्देश पाठविण्यात आले असल्याचेदेखील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.