दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी पातूरच्या कलावंताने साकारल्या मूर्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:54+5:302021-02-05T06:12:54+5:30
संतोषकुमार गवई पातूर : महाराष्ट्रातील संतांच्या महान परंपरेला उजाळा देणारा यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर ...
संतोषकुमार गवई
पातूर : महाराष्ट्रातील संतांच्या महान परंपरेला उजाळा देणारा यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे. राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली असून, या चित्ररथात वैदर्भीय कलावंतांनी घडविला. राज्याचा चित्ररथ अकोला जिल्ह्यातील पातूर येथील मूर्तिकार विनय बगळेकर यांनी विठुरायांसह संत गोरोबाकाका, संत जनाबाई यांचे पुतळे साकारले आहेत.
यंदा दिल्लीच्या राजपथावर जिल्ह्यातील पातूरसह अमरावती, यवतमाळ, नागपूर अशा वैदर्भीय शिल्पकारांची कलाकृती यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ज्ञानेश्वरी गंध दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. यापाठोपाठ महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची कटेवर हात असणारी सुमारे साडेआठ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा संतवाणी हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. या चित्ररथातील पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून, पातूरचे शिल्पकार विनय बगळेकर यांनी प्रमुख पुतळ्याची निर्मिती केली आहे. दिल्लीच्या राजपथवर मंगळवारी होणाऱ्या पथसंचलनात राज्याचा चित्ररथ प्रमुख आकर्षण उरणार असून, चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत.
विनय बगळेकरांचे होतेय कौतुक!
पातूर शहरातील शनिवार पुरा येथील मूळचे रहिवासी असलेले शिल्पकार आर्टिस्ट विनय श्यामलाल वगळेकर यांचे चित्ररथात मोठे योगदान आहे. वगळेकर यांनी खामगावातून कल्चर पूर्ण केले असून, त्यांचे मुख्य सेंटर मुंबईचे जेजे स्कूल ऑफ आर्ट होते. विनय यांनी छत्रपती शिवराय, संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासह संत चोखोबा आणि संत जनाबाई यांचे पुतळे मूव्हिंग आहेत, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वगळेकरांसह यवतमाळचे प्रवीण पिल्लारे, अमरावतीचे शिवप्रसाद प्रजापती यांनीही तीन फिरते शिल्प साकारले आहे. या चित्ररथात सहभागी अन्य सहकलावंतांमध्ये आकाश, भूषण, सचिन मने या वैदर्भीय कलावंतांचा सहभाग आहे.