कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता भौतिक सुविधा नसल्यास रद्द!
By admin | Published: April 27, 2017 01:23 AM2017-04-27T01:23:45+5:302017-04-27T01:23:45+5:30
लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी: प्रवेश प्रक्रियेपूर्वीच सुविधा उपलब्ध करा!
अकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यास, त्या महाविद्यालयांना अकरावी वर्गासाठी प्रवेशित विद्यार्थी देण्यास येणार नाहीत आणि त्यांची मान्यता रद्द करण्यासंदर्भातील प्रस्तावसुद्धा शिक्षण संचालकांकडे पाठविण्याचा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला.
शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी आॅनलाइन किंवा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, ग्रंथालय, पाठ्यपुस्तकांची सुविधा नाही; परंतु सुविधांच्या नावाखाली अपप्रचार करून कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात; परंतु त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत नाहीत. शिक्षण हक्क कायदा २00९ नुसार विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देणे बंधनकारक आहे; परंतु कनिष्ठ महाविद्यालये त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या येथे भौतिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती मे महिन्यात कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिक सुविधांची तपासणी करणार आहे. अकरावी प्रवेश प्रकियेपूर्वी भौतिक सुविधा उपलब्ध न करणाऱ्या महाविद्यालयांना अकरावी वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी देण्याची परवानगी नाकारण्यात येईल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासंदर्भातसुद्धा शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे.
शिक्षण विभागाने अनेकदा कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केली. तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थितीसह भौतिक सुविधा नसल्याचेसुद्धा समोर आले आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील भौतिक सुविधा समितीमार्फत तपासणी करण्यात येईल.
- प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद.