कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असतील तर रुग्णावर होम आयसोलेशनमध्येच उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:31 AM2020-06-08T10:31:28+5:302020-06-08T10:31:34+5:30
ति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांनाच घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लक्षण नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षण असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार घेता येणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यात अद्याप तरी आरोग्य यंत्रणेने या पयार्याचा विचार केला नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळते.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवेवर ताण येताना दिसत आहे. त्यामुळे उपचारासंदर्भात आणखी शिथिलता आणून हा बदल करण्यात आला आहे. नवीन शिथिलतेनुसार ज्या रुग्णांचे अहवाल बाधित आहेत; मात्र त्यांच्यात अतिसौम्य किंवा लक्षणेच नसतील अशा रुग्णांना घरीच उपचार घेतले जातील. यामध्येही सौम्य, अति सौम्य लक्षणे, मध्य तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणे असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील अति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांनाच घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शक सूचनाही शासनाने सांगितल्या आहेत.
शासन निर्णयानुसार उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल प्रमाणित केलेले असावे. रुग्णाच्या घरी योग्य सुविधा असाव्या. चोवीस तास काळजी घेणारी व्यक्ती घरी असावी. रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यात संपर्क असणे गरजेचे आहे. काळजी घेणारी व्यक्ती व संपर्कातील व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन घ्यावी. रुग्णांनी नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे. रुग्णाने गृह विलगीकरणाबाबत प्रतिज्ञापत्र भरून देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सध्या अंमलबजावणी नाही
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात होम क्वारंटाइनच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणाबाबत काटेकोर नियम पाळले जातील का, असा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अद्याप तरी नव्या शिथिलतेची अंमलबजावणी केली नाही. मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
अशावेळी घ्यावी वैद्यकीय मदत
रुग्णामध्ये गंभीर लक्षणे जसे की धाप लागणे, श्वसनास अडथडा, छातीत सतत दुखणे, शुद्ध हरपणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी लक्षणे आढळल्यास रुग्णाने वैद्यकीय मदत घ्यावी, असेही मार्गदर्शनक सूचनांमध्ये सांगितले आहे.