धान्याचा काळाबाजार केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:45 AM2017-10-04T01:45:43+5:302017-10-04T01:46:02+5:30
अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याचे ४0 ते ५0 टक्के धान्य गोदामपाल, दुकानदार, दलालांची साखळी मध्येच हडप करण्याचे प्रकार यापूर्वी सातत्याने घडले आहेत. त्यातच दुकानदार गावातील लाभार्थींसाठी मिळणार्या शंभर टक्के धान्याची उचल न करता ते परस्पर काळाबाजारात नेण्याच्या घटनाही घडल्या. त्यातून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. त्याला आवर घालण्यासाठी शासनाने द्वारपोच धान्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार दुसर्या टप्प्यात धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम उद्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर धान्याची उचल शासकीय गोदामातून करावी लागायची. द्वारपोच उपक्रमात ते बंद झाले आहे. शासकीय गोदाम ते गावातील धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचून देण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदाराची आहे. वाहन गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करून दुकानदाराला सोपवले जाणार आहे. त्यासाठी गावातील पंच मंडळींची साक्षही राहणार आहे. त्यामुळे एकदा गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार करणे दुकानदाराला अशक्य होणार आहे. द्वारपोच धान्य वाटपासाठी कालर्मयादाही निश्चित झाली आहे. महिन्याच्या ठरलेल्या तारखेपासून दुकानांमध्ये धान्य पोहोचणार आहे. धान्याचे वाहन गावात पोहोचल्याची माहिती तलाठय़ाकडून दवंडीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे गावात ठरावीक तारखेला मिळालेले धान्य शंभर टक्के वाटप करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसात मालाची उचल करून तो साठा परस्पर गायब करण्याचेही प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधित अधिकार्यांची जबाबदारीही निश्चित केली आहे.
काळाबाजार झाल्यास प्रत्येकजण जबाबदार
पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी, गोदामपाल, हमाल कंत्राटदार, वाहतूकदार यांनी त्यांची ठरलेली कामे करण्याचे जिल्हाधिकार्यांनी बजावले आहे. या सर्वांनी आपापली कामे ठरल्याप्रमाणे केलीच पाहिजे, असा दमही त्यांनी भरला आहे. दुकानदारांनी पॉस मशीनद्वारे वाटप करावे, त्यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड घेऊन दुकानात जावे, परिमाणानुसार धान्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लाभार्थींनी जागृत व्हावे!
गावात पोहोचलेल्या धान्याचे शंभर टक्के वाटप होते की नाही, याची पडताळणी ग्रामस्तरीय दक्षता समितीने करावी, तलाठय़ाने त्याकडे विशेष लक्ष द्यावे, दुकानदारांकडून ठरलेल्या परिमाणाएवढे हक्काचे धान्य घ्यावेच, त्याची पावतीही ग्राहकांनी घ्यावी, गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार होणार नाही, ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी केले.
-