आयात धोरण न बदलल्यास मूग-उडीद डाळीचे भाव तिपटीने वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:34 PM2019-11-03T14:34:30+5:302019-11-03T14:34:37+5:30
- संजय खांडेकर अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन ...
- संजय खांडेकर
अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन पीक आले नाही अन् दुसरीकडे सरकारने आयात धोरणात अद्याप बदल केलेला नसल्याने उडीद आणि मूग डाळीचे भाव तिपटीने वाढण्याचे संकेत आहे.
परतीच्या पावसाने यंदा उशिरापर्यंत मुक्काम ठोकल्याने तयार झालेले पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले, त्यामुळे यंदा मूग आणि उडीद बाजारपेठेत अत्यल्प आहे. दरम्यान, भारत सरकारने ३१ आॅक्टोबरपर्यंतच धान्याचे इम्पोर्ट (आयात) सुरू ठेवले. आता नव्याने येणारा मूग-उडीदचा विदेशी कोटा घेण्यासाठी कोणतेही नवीन धोरण सरकारने आखलेले नाही. दरवर्षी म्यानमारमधून उडीद आणि आफ्रिकेतून मुगाचा साठा येत असतो, तो आलादेखील; मात्र आलेला साठा पुरेसा नाही. सोबतच यंदा देशांतर्गत पीक नाहीसारखे असल्याने आणि आयात धोरणात बदल होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास दोन्ही कडधान्याच्या डाळी महाग होण्याचे संकेत आहे. त्याची चाहूल बाजारात जाणवू लागली आहे. बाजारात येत असलेल्या मुगाला ५१०० पासून तर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. उडदाला ४५०० पासून तर ६५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. दोन्ही कडधान्याचे भावही वधारणार असल्याचे संकेत आहेत.
-म्यानमार आणि आफ्रिका दोन्ही देशात सध्या मूग-उडीदचे भाव कमी असून, केंद्र शासनाने आयातीचा नवीन कोटा वाढविला पाहिजे, त्यामुळे दोन्ही डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अन्यथा दोनशे रुपयांपर्यंत डाळींचे भाव पोहोचण्याची शक्यता आहे.
-वसंत बाछुका,उद्योजक अकोला.
मूग-उडीदला मागणी कशासाठी..
ईडली, डोसा, पापळ, वडे आदी पदार्थ दररोजच्या खाण्यात हॉटेलींगमध्ये असते. त्यामुळे तूर डाळीप्रमाणेच मूग-उडीदला मोठी मागणी आहे. जर मूग-उडीदच्या डाळीचे भाव वधारले तर त्यापासून तयार होणाºया उपरोक्त पदार्थांचे भावही वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दोन दिवसांत उडीद डाळीचे भाव वधारले
मागिल काही दिवसांआधीपर्यंत उडीद डाळीचे भाव ८० ते ९२ रुपये किलो प्रमाणे होते; मात्र उडीदमध्ये येत असलेला तुटवडा लक्षात येताच उडीद डाळीचे भाव २० ते २५ रुपये किलो मागे वधारले आहे. शनिवारी उडीद डाळीचे भाव ११० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले.