‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार - अॅड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:03 PM2020-07-27T19:03:55+5:302020-07-27T19:04:02+5:30
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉकडाऊनचे नियम तोडतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
अकोला : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनची मुदत ही वाढतीच आहे. सध्या सुरू असलेले लॉकडाऊन हे ३१ जुलै रोजी संपेल, या लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉकडाऊनचे नियम तोडतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
येथील विश्रामगृहावर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले की, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक विवंचना वाढली आहे. या वर्गाला मदत करणारे दातेही आता थकले आहेत. त्यांचेही दातृत्व संपत आले आहे, त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढविल्यास गरिबांवर उपासमारीची वेळ येईल. कोरोनामुळे मृत्यू होण्याऐवजी उपासमारीनेच मृत्यू होतील, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आता लॉकडाऊन वाढवू नये. जर सरकारने लॉकडाऊन वाढवले तर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून नियम तोडण्याचे आवाहन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने आता कोरोनाची भीती दाखविण्यापेक्षाा जनतेला कोरोनासोबत जगण्यासाठी तयार करण्याची गरज आहे. देशाची एकूणच अर्थव्यवस्था या कोरोनामुळे धोक्यात आली आहे, त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास त्याचे नियम तोडण्यात आम्ही पुढे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.