'राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवारच देशाचे पंतप्रधान'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 10:08 AM2019-04-15T10:08:37+5:302019-04-15T10:33:03+5:30
माजीद मेमन हे अकोल्यातील आघाडीचे लोकसभा उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी आले होते.
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी म्हटले आहे. मेमन हे निवडणूक प्रचारासाठी अकोला येथे आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे भाकित केले आहे. आघाडीचे सरकार स्थापन करायची वेळ आल्यास, शरद पवार यांचे नाव आघाडीवर असेल, असेही मेमन यांनी म्हटले.
माजीद मेमन हे अकोल्यातील आघाडीचे लोकसभा उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. सध्या आमच्या पक्षाकडे जास्त खासदार नाहीत. दुर्दैवाने आमचा पक्षही तेवढा मोठा नाही. पण, 2-3 खासदार असलेले देवेगौडा या देशाचे पंतप्रधान बनल होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडूण आल्यास आणि आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास, शरद पवार यांचेच नाव आघाडीवर असेल, असेही मेमन यांनी म्हटले.
शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत. संसदेत कामकाज सुरू असताना सभागृह स्थगित झाले, तर सर्व नेते त्यांच्याजवळ जमतात. एखादे विधेयक तयार करायचे असेल, तर त्या विधेयकाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांचा पवार यांना पाठिंबा राहिले, हेही सांगायला ते विसरले नाहीत. दरम्यान, अकोला मतदारसंघात हिदायत पटेल यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकराचे तर महायुतीकडून अॅड. संजय धोत्रे यांचे आव्हान आहे.