नळ जोडणी वैध न केल्यास फौजदारी !
By admin | Published: July 2, 2014 12:23 AM2014-07-02T00:23:57+5:302014-07-02T00:30:56+5:30
मनपा प्रशासनाने तात्काळ पत्रकार परिषदेचे आयोजन करीत भूमिका स्पष्ट केली.
अकोला : अवैध नळ जोडणी शोध मोहिमेत महापालिकेच्या कुचकामी नियोजनामुळे कारवाई थंडावली असून, नेमक्या किती वर्षांची थकीत पाणीपट्टी जमा करायची, याबाबत अकोलेकरांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. यासंदर्भात मंगळवारी मनपा प्रशासनाने तात्काळ पत्रकार परिषदेचे आयोजन करीत भूमिका स्पष्ट केली. यामध्ये अवैध नळ जोडणी धारकांना १५ जुलैपर्यंत नळ जोडणी वैध करण्याची अंतिम मुदत देत त्यानंतर मात्र फौजदारी दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध पोलिस तक्रारीचे निर्देश दिले; परंतु पाण्याचा व्यावसायिक वापर करणार्या व सर्वसामान्य नागरिकांनी किती दिवसाची थकीत पाणीपट्टी जमा करायची, याबद्दल एकवाक्यता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम पसरला. त्यावर मनपाचे शहर अभियंता अजय गुजर यांनी भूमिका स्पष्ट करीत व्यावसायिकांनी मागील पाच वर्षांची तर सर्वसामान्य नागरिकांनी तीन वर्षांंची थकीत पाणीपट्टी जमा करणे बंधनकारक करण्यात आले.
पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात एक दिवसाने वाढ करण्यात आली असून, अकोलेकरांना चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
नळ जोडणी वैध करण्यासाठी मनपाने जलप्रदाय विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली.