परिस्थितीला बदलू शकत असाल, तर बदलून टाका - सतीश फडके
By admin | Published: October 9, 2015 01:58 AM2015-10-09T01:58:18+5:302015-10-09T01:58:18+5:30
विदर्भस्तरीय मुख्याध्यापक संघाची कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात.
अकोला: शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर तक्रारी करू नका. परिस्थितीला बदलू शकत असाल, तर बदलून टाका अन्यथा परिस्थितीचा स्वीकार करा, असे मत प्रा.सतीश फडके यांनी व्यक्त केले. हिंगणा फाटास्थित प्रभात किड्स शाळेत गुरुवारी आयोजित विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विदर्भस्तरीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष मारोतराव खेडेकर होते. तर मेस्टा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.गजानन नारे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, विलास भारसाकळे, नरेंद्र वाळके, अशोक पारधी, प्रवीणा शहा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खेडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रा. फडके यांनी उपस्थित मुख्याध्यापकांच्या सामान्य जीवनातील उदाहरण देऊन त्यांना परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले. शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि त्यातून उद्भवणार्या समस्यांमुळे मुख्याध्यापकांवर ताण येतो. त्यामुळे मुख्याध्यापकांना ही परिस्थिती बदलणे शक्य असेल तर ती तत्काळ बदलून टाका किंवा त्या परिस्थितीला स्वीकारून परिस्थितीनुसार जीवन जगण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. वेळ ही पैशांहून मौल्यवान असल्याने आपल्या वेळेचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सचिन बुरघाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश जगताप यांनी तर सूत्रसंचालन विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष, नागपूर, मंदा उमाटे यांनी केले. आभार प्रदर्शन बळीराम झामरे यांनी मानले.