वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:50+5:302021-09-21T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : रस्त्यावर एकत्र येऊन वाढदिवस साजरा करणे, उत्सव अथवा एखादा कार्यक्रम साजरा करणे किंवा आंदोलन, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रस्त्यावर एकत्र येऊन वाढदिवस साजरा करणे, उत्सव अथवा एखादा कार्यक्रम साजरा करणे किंवा आंदोलन, निदर्शने करण्यावर बंदी आहे. जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तसे आदेश कोरोना काळात दिले आहेत.
रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणेही या अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे अशा प्रकारचे उघड्यावरील ‘बर्थ-डे सेलिब्रेशन’मुळे जेलची हवाही खावी लागू शकते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही उघड्यावर वाढदिवसानिमित्त केक कापणे, फटाके फोडणे, धांगडधिंगा घालणे हे सर्व प्रकार सार्वजनिक शांतता भंग करणारे व प्रशासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणारे ठरतात, त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाढदिवसाचा आनंद लुटणाऱ्यांविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. यावरून यापुढे वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर खबरदार राहण्याची गरज आहे, अन्यथा तुमच्यावर फौजदारी कारवाई निश्चित होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
...तर होतील गुन्हे दाखल
- रस्त्यावर अथवा एखाद्या चौकात दुचाकी, चारचाकी आडवी लावून रहदारीस अडथळा निर्माण केल्यास.
- वाहनांवर केक ठेवून तो भररस्त्यात कापून जल्लोष केल्यास.
- तलवारीसह अन्य कुठल्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करत केक कापणे.
- भरचौकात ढोल-ताशा वाजवून फटाके फोडणे, डीजे लावणे.
- जोरजोराने आरडाओरड करत धिंगाणा घालणे.
- यामुळे उघड्यावर भररस्त्यात अथवा कॉलन्यांच्या मोकळ्या भूखंडांवर उद्यानांमध्ये वाढदिवस साजरा केल्यास कारवाई होऊ शकते.
वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे गुन्हा ठरतो...
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनाई आदेश लागू असून, त्याचे पालन करणे प्रत्येकावर बंधनकारक आहे. यामुळे शहरातील कुठल्याही प्रकारच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सार्वजनिक शांततेचा भंग व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे कृत्य गुन्हा मानला जाईल. त्यामुळे रस्त्यावर अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणे टाळावे.
- सचिन कदम, शहर पोलीस उपअधीक्षक अकोला.