आमिषाला बळी पडून गुंतवणूक कराल तर फसाल
By admin | Published: July 1, 2015 01:40 AM2015-07-01T01:40:16+5:302015-07-01T01:40:16+5:30
सीआयडीचे गजानन शेळके यांनी दिला सावध राहण्याचा सल्ला.
अकोला : एका महिन्यात दामदुप्पट, गुंतवणुकीवर भरघोस व्याज, किरकोळ रक्कम गुंतवणूक केल्यास घर देण्याचे आमिष किंवा अत्यंत कमी व्याजदराचे आमिष दाखवून कर्जपुरवठा करणार्या संस्था व कंपनीमध्ये गुंतवणूक करीत असाल तर यापुढे सावधान होणे गरजेचे असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक गजानन शेळके यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सामान्य गुंतवणूकदार जास्त व्याजाच्या मोहापायी कष्टाची आयुष्यभराची कमाई अशा बोगस वित्तीय संस्था, क्रेडिट सोसायटी व कंपन्यांमध्ये गुंतवून आयुष्यभर केलेली कमाई एका झटक्यात गमावत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. राज्यातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात दोन ते तीन टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखविण्यार्या शेकडो वित्तसंस्था सध्या कार्यरत असून, या संस्था स्थानिक भागातील एजंट नेमून गरजू व्यक्तींना हेरण्याचे काम करतात. त्यानंतर कागदपत्र व प्रोसेसिंग फीच्या नावाखाली हजारो रुपये उकळण्यात येत असून, यामध्ये सध्या वित्त संस्था, क्रेडिट सोसायटी, मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी, संस्था व पतसंस्था मोठय़ा प्रमाणात असल्याची माहिती आहे. राज्य गुन्हे अन्वेषणच्या अकोला कार्यालयाकडे सद्य:स्थितीत अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांचा तपास असून, त्यामध्ये आर्यरूप टुरिझम, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, केबीसी, ओम फायनान्सचा समावेश आहे. यामधील बहुतांश वित्त संस्था, कंपन्या, क्रेडिट सोसायट्यांकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून मान्यता नसल्याचेही तपासात समोर आले असल्याची माहिती शेळके यांनी दिली.