पक्षामध्ये बोलता आले असते, तर लेख कशाला लिहिला असता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:41 AM2017-10-16T02:41:52+5:302017-10-16T02:42:50+5:30
अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.
अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.
प्रमिलाताई ओक हॉलमध्ये जाहीर व्याख्यान संपल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपली संस्कृती ही ज्येष्ठांचा आदर करणारी, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढे मार्गक्रमण करणारी आहे. त्यादृष्टीने विचार केला, तर सध्या भाजपामध्ये ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, हे मान्यच करावे लागेल. प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते, जेथे ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, त्या घरातील मुलांबाबत काय म्हटले जाते, ते आपणास माहीत आहे, असा टोला लगावत त्यांनी हा संस्कृतीशी निगडित प्रश्न आहे. पार्टीच्या नियमांचा नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.
सरकारच्या अनेक धोरणांमध्ये विसंगती आहे, जीएसटीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, तरच हा गुड अँण्ड सिम्पल टॅक्स होईल, असे स्पष्ट करतानाच कोणतेही आर्थिक धोरण स्वीकारताना त्याचा फायदा-तोटा काय होईल, हे सांगावे लागते. सरकारमध्ये सध्या खूप लायक लोक बसलेले आहेत, त्यांनी जीएसटीचा फायदा सांगावा, असे आव्हान त्यांनी दिले. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असलाच पाहिजे, हा आग्रह नाही; मात्र शेतीचे निश्चित असे आर्थिक धोरण आवश्यक आहे. या धोरणांना नशिबाचीही साथ लागते, मान्सूनवर या धोरणांचे यश-अपयश अवलंबून असते, त्यामुळे या सरकारने अशा धोरणांचा पुनर्विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढती महागाई व बेरोजगारी हे जिव्हाळय़ाचे प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक झाल्याशिवाय लोकांचा विश्वास कमावता येत नाही. या मुद्यावर भाजपा सरकार अपयशी ठरल्याचीही टीका त्यांनी केली.
पार्टीचे नियम बदलत राहतात
कम्युनिस्ट पार्टीमध्ये राज्यसभा सदस्यत्व देण्यासाठी केवळ दोन टर्मची अट आहे, तिचे कसोशीने पालन केले जाते. सीताराम येचुरीसारख्या ज्येष्ठ व प्रभावी नेत्यालाही तिसरी टर्म मिळाली नाही. आमच्या पक्षानेही असेच धोरण स्वीकारले व दोन ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभेवर संधी दिली नाही. त्यानंतर मात्र हा नियम बदलला व आता चार टर्मवाले नेतेही आमच्याच पक्षात आहेत, त्यामुळे पक्षाचे नियम हे बदलते राहतात, अशा शब्दांत सिन्हा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
-