मूलभूत सुविधा हव्या असतील तर कराचा भरणा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:17 AM2021-03-24T04:17:08+5:302021-03-24T04:17:08+5:30
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आज राेजी माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या ...
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आज राेजी माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले हाेते. मालमत्तांची दरवाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघण्यासह उत्पन्नात वाढ हाेण्याचा प्रशासनाने दावा केला हाेता. करवाढीच्या निर्णयाला विराेध करीत नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून अकाेलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्याला आखडता हात घेतला. परिणामी कराच्या उत्पन्नात घसरण आली. कोरोनाचे संकट लक्षात घेता या काळात प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांना काेणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अप्रिय कार्यवाही केली नाही. शहरातील नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा पुरविणेही गरजेचे असून त्यासाठी मनपाला निधीची आवश्यकता आहे. निधीची कमतरता असल्याने मूलभूत सुविधा पुरविणे शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा हव्या असतील तर तातडीने मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
प्रमाणपत्रासाठी पावती अनिवार्य
शहरवासीयांना १ एप्रिलनंतर मूलभूत साेयीसुविधा किंवा कोणतेही प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांनी थकीत कराचा भरणा केल्याची पावती दाखवणे प्रशासनाने अनिवार्य केले आहे. यामध्ये बांधकाम परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, वैयक्तिक तक्रारी व सर्व प्रकारचे परवाने असेसमेंट नक्कल व इतर दस्तऐवजांचा समावेश आहे.