"सरकारविरोधात बोलला की तुम्ही देशद्रोही; म्हणून जनजागरण यात्रा"
By आशीष गावंडे | Published: February 21, 2023 05:41 PM2023-02-21T17:41:00+5:302023-02-21T17:43:35+5:30
मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. ...
मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. बेसुमार वाढलेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारकडून डोळेझाक केली जात आहे. यावर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मस्तकी देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा ट्रेंड सुरु झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा माजी मंत्री फौझिया खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
वाढलेली महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला कार्यकारिणीच्यावतीने राज्यभरात जनजागरण यात्रा काढली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून प्रारंभ झालेली यात्रा मंगळवारी अकोल्यात दाखल झाली असता, राकाँच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौझिया खान यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरले असून बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना भाजपाचे नेते सातत्याने टीका करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत होते. परंतु आता अनेक समस्या असल्या तरी त्यावर भाजपाकडून चूप्पी साधली जात असून तरुणांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे.
आज देशात १ टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती असणे हे चित्र योग्य नसल्याचे फौझिया खान म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जनजागरण यात्रेच्या राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे, महिला निरीक्षक मंदाकिनी पाटील, निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ.आशा मिरगे, मंदा देशमुख, महिला शहराध्यक्ष सुषमा निचळ, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मा.नगरसेवक मनोज गायकवाड, पंकज गावंडे, रायुकाँ शहराध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर उपस्थित होते.
विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न!
लोकशाहीमध्ये काही बाबींना विरोध होणारच. परंतु सरकारला हा विरोध सहन होत नसल्यामुळे विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांनाच संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला असता भाजपचा दारुण पराभव झाला. यावरुनच इव्हीएममध्ये हेराफेरी होते,हे लक्षात येत असल्याचे फौझिया खान यांनी सांगितले.