गरीब शेतक-यांसाठी ‘आयजी’ सरसावले !
By admin | Published: September 1, 2016 02:38 AM2016-09-01T02:38:54+5:302016-09-01T02:38:54+5:30
शेतक-यांची माहिती घेण्याची पाचही जिल्हय़ातील पोलिसांना सूचना.
सचिन राऊत
अकोला, दि. ३१: यवतमाळ येथे एकाच झाडाला शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज चिरणारी घटना उघड झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हय़ातील गरीब आणि गरजू शेतकर्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मंगळवारी रात्री पोलीस अधिकार्यांना केल्या आहेत. ज्या शेतकर्यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि शेतकरी बेताचीच परिस्थितीत जगत असलेल्या शेतकर्यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आधार मिळणार आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकर्यांसमोर कुटुंब पोसण्याची प्रश्न निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात आत्महत्या वाढल्या आहेत.
घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांसमोर जगण्याचे संकट उभे ठाकते. जगावे किंवा मरावे, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पोलीस विभाग सरसावला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय-योजना पोलिसांकडून राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकार्यांना केल्या आहेत.
ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी आणि पोलीस कर्मचार्यांनी शेतकर्यांचे सर्वेक्षण करून गरीब शेतकर्यांची एक यादी तयार करण्याचे सांगितले आहे. यासोबतच ज्या शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च जास्त आहे, ज्या शेतकर्यांच्या मुलीचे लग्न आहे, अशा शेतकर्यांची नोंदणी करून त्याची एक यादी तयार करुन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचेही प्रयत्न पोलिस विभागाकडून होत आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांचीही मदत घेतली जाईल.