जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५७ पैसे !
By संतोष येलकर | Published: September 30, 2023 07:39 PM2023-09-30T19:39:05+5:302023-09-30T19:39:15+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली लागवडीयोग्य ९९० गावांची पैसेवारी
अकोला: यंदाच्या खरीप हंगामातील जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांतील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५७ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा जास्त आहे.यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने महिनाभर उशिराने हजेरी लावल्याने जिल्हयातील खरीप पिकांची पेरणी विलंबाने करण्यात आली.
त्यामध्ये पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग व उडिद या पिकांच्या पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या जुलैमध्ये जिल्हयात सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. दरम्यान, पेरणीनंतर गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला होता. त्यामध्ये काही भागांत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्हयातील सर्वच नदी व नाल्यांना पूर आले होते. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला होता. त्यानंतर सद्यस्थितीत खरीप पिकांची स्थिती समाधानकारक असतानाच जिल्हयातील सातही तहसील कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ५७ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
तालुकाानिहाय गावे अन्
नजरअंदाज पैसेवारीचे वास्तव !
तालुका गावे पैसेवारी
अकोला १८१ ५५
अकोट १८५ ५७
तेल्हारा १०६ ५५
बाळापूर १०३ ५६
पातूर ९४ ६२
मूर्तिजापूर १६४ ५७
बार्शिटाकळी १५७ ५८
........................................................
कपाशी, सोयाबीन
पिकाचा समावेश !
जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हयातील कपाशी आणि सोयाबीन या पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचा समावेश आहे.
सुधारित पैसेवारी
पुढील महिन्यात !
जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार जिल्हयातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ५७ पैसे असली तरी, जिल्हयातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी पुढील महिन्यात ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.