अकोल्यात गर्भपाताचा गोरखधंदा; नर्सिंग होम सील, बोगस डॉक्टर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 08:39 AM2019-07-22T08:39:31+5:302019-07-22T12:18:11+5:30

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम सील केले . बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Illegal abortion in a nursing home in Akola | अकोल्यात गर्भपाताचा गोरखधंदा; नर्सिंग होम सील, बोगस डॉक्टर ताब्यात

अकोल्यात गर्भपाताचा गोरखधंदा; नर्सिंग होम सील, बोगस डॉक्टर ताब्यात

Next
ठळक मुद्देया हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात करण्याचा सपाटाच राजरोसपणे सुरू केला होता. विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी रविवारी रात्रीला छापा टाकला. बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली.


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम या ठिकाणी एका डॉक्टरने बेकायदेशीर गर्भपात सुरू केल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी रविवारी रात्रीला छापा टाकला. या पथकासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम सील केले आहे व बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
रूपेश तेलगोटे नामक बोगस डॉक्टरने न्यू भागवत प्लॉट परिसरात ऋषी नर्सिंग होम हे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात करण्याचा सपाटाच राजरोसपणे सुरू केला होता.
सदर बोगस डॉक्टरसह बेकायदेशीर सुरू असलेल्या या हॉस्पिटलची आणि अवैधरीत्या सुरू असलेल्या गर्भपाताची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना काही महिन्यांपूर्वी मिळाली. बहाकर यांनी त्यांच्या पथकासह या हॉस्पिटलवर पाळत ठेवली. रविवारी रात्री सापळा रचला.
बनावट पती तसेच गर्भवती महिला या रुणालयात पाठविले. या बनावट पतीने इशारा देताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सदर रुग्णालय तसेच डॉक्टरच बोगस असल्याचे आढळून आले. सदर कारवाईत बोगस डॉक्टर रूपेश तेलगोटे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला सहकार्य करणारी परिचारिका वैशाली संजय गवई, रा. पातूर व गर्भपाताच्या किट्स आणून देणारा रवी भास्कर इंगळे या तिघांना रविवारी रात्री ११.३0 वाजता अटक करण्यात आली. या कारवाईत वैद्यकीय आरोग्य अधिकारी फारुख शेख, अ‍ॅड. शुभांगी खाडे, अंकुश गंगा खेडकर, हेमंत मेटकर यांनी सहभाग घेतला.


आरोग्य विभाग झोपेत
जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीर सुरू असलेल्या तसेच बोगस डॉक्टरने चालविलेल्या हॉस्पिटलची माहिती मिळाली. या ठिकाणी अवैधरीत्या राजरोस सुरू असल्याचीही पथकाला माहिती मिळाली; मात्र हीच माहिती आरोग्य विभागाला का मिळाली नाही, हा प्रश्न निर्माण झाला असून, आरोग्य विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


गर्भपाताच्या किट्स सहज उपलब्ध
ऋषी नर्सिंग होम या ठिकाणी महिलांचे गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाºया गर्भपाताच्या किट्स या दवा बाजारातील काही व्यापाऱ्यांनी पुरविण्याची माहितीही सूत्रांनी दिली. यासाठी काही ‘एमआर’ आणि दलाल डॉक्टर तेलगोटेच्या संपर्कात होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक बडे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.


रुग्णालयच बेकायदेशीर!
 ऋषी नर्सिंग होम या हॉस्पिटलचा डॉक्टर संचालक रूपेश तेलगोटे हा केवळ १२ वी शिकला असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी असल्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे या डॉक्टरसह सदर हॉस्पिटलही बोगस असल्याचे स्पष्ट होते. येथे काम करणाºया परिचारिकाही बोगस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बोगस डॉक्टरकडे शहरातील काही डॉक्टर महिलांना गर्भपातासाठी पाठवित असल्याची माहितीही सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या गोरखधंद्यात शहरातील नामांकित डॉक्टर ही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Illegal abortion in a nursing home in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.