अवैध सावकारी प्रकरण: आरोपी गजाआड
By admin | Published: May 20, 2017 01:19 AM2017-05-20T01:19:50+5:302017-05-20T01:19:50+5:30
अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याला अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याला अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
सावकारी अधिनियमाची योग्य पद्धतीने व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी गठित करण्यात आलेल्या भरारी पथकाने १३ मे रोजी आपातापा रोड परिसरातील संतोष गोविंद भोसले (रा. संत कबीर नगर) याच्या निवासस्थानी छापा टाकून अवैध सावकारीचा भंडाफोड केला होता.
या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे खरेदीखत, कोरे धनादेश, बँक पासबुकसह अवैध सावकारीबाबतचे दस्तावेज जप्त करण्यात आले होते. तालुका उपनिबंधक कार्यालयात संतोष इंगळे व मनकर्णा पाचपोहे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. इंगळे यांच्या मालकीची आपातापा शिवारामधील पाच एकर शेतीचा संतोष भोसलेंशी व्यवहार झाला होेता. त्यानंतर हा व्यवहार पलटण्यात आला. या तक्रारीनुसार उपनिबंधक कार्यालयाने प्राथमिक व गोपनीय चौकशी केली. त्यानंतर शनिवारी थेट संतोष भोसलेच्या घरावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले. पंचनामा केल्यानंतर तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलीस ठाण्यात संतोष भोसलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमन २०१४ चे कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी भोसले फरार झाला; मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन शनिवारी सदर आरोपीस अटक केली असून, शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.