मुरुमाचे अवैध उत्खनन; पाच ट्रॅक्टर मालकांना साडे सहा लाखांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 10:43 AM2021-03-10T10:43:37+5:302021-03-10T10:43:44+5:30
Akola News शासकीय जागेतून १२० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर मालकांना ९ मार्च रोजी पातूरच्या तहसीलदारांनी साडे सहा लाख रुपयांचा दंड सुनावला.
- नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे शासकीय जागेतून १२० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर मालकांना ९ मार्च रोजी पातूरच्या तहसीलदारांनी साडे सहा लाख रुपयांचा दंड सुनावला. चतारी येथील शासकीय जागेतून २८ जानेवारी रोजीच्या पंचनाम्यामध्ये ७० ब्रास, तसेच १९ फेब्रुवारी रोजीच्या पंचनाम्या मध्ये ५० ब्रास असे १२० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे रात्रंदिवस उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी वृत्ताची दखल घेऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये २८ जानेवारी ते १९ फेब्रुवारी अशा वीस दिवसांमध्ये १२० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात आल्याचे अहवालामध्ये निष्पन्न झाले होते. सदर अहवालावरून तहसीलदार दीपक बाजड यांनी प्रति ब्रास पाच हजार, १२० ब्राससाठी सहा लाख व स्वामित्व धनाची रक्कम ४०० प्रति ब्रास प्रमाणे ४८ हजार रूपये असा एकूण सहा लाख ४८ हजार रूपयांचा दंड पाच ट्रॅक्टर मालकांना सुनावला. प्रत्येकी ट्रॅक्टर मालकाला १,२९,६०० रूपये प्रमाणे दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
अवैध उत्खनन करणारे ट्रॅक्टर मालक
गुलाब सखाराम मांजरे, अनिल रामराव बोचरे, रामप्रसाद सूर्यभान शेवलकार, गोपाल ज्ञानदेव अढाऊ, नारायण तोताराम ढोरे, या पाच ट्रॅक्टर मालकांना साडेसहा लाखाचा दंड भरावा लागणार आहे. एका महिन्याच्या आत दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याचे आदेशामध्ये नमूद आहे.
रस्त्याच्या कामात झाला मुरुमाचा वापर
गेल्या काही दिवसांपासून सांगोळा ते पिंपळखुटा या रस्त्याचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या कामात गैरकायदेशीर मुरुमाचे उत्खनन करून या रस्त्याच्या कामात वापर करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या मुरूमाची तपासणी करण्याची गरज आहे.
तहसीलदारांच्या नोटिशीला केराची टोपली
गावातील पाच ट्रॅक्टर मालकांनी २० दिवसांमध्ये १२० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्यात आल्याचे अहवालानुसार उघड झाल्यावर त्यांना आपला जबाब नोंदविण्यासाठी तहसीलदारांनी नोटीस बजावली होती. परंतु तहसीलदारांच्या नोटीसला ट्रॅक्टर मालकांनी केराची टोपली दाखवली आणि दिलेल्या मुदतीत जबाब नोंदविला नाही.