सरकारी जमिनीवरील टेकड्या पोखरून भुयारांमधून वाळूचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 11:40 AM2021-12-22T11:40:51+5:302021-12-22T11:41:05+5:30
Illegal excavation of sand : बाळापूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात ‘डीएमओं’च्या पाहणीत उघड झाला प्रकार.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पिंपळगाव शिवारात सरकारी जमिनीवरील टेकड्या पोखरुन ठिकठिकाणी तयार केलेल्या भुयारांमधून वाळूचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी (डीएमओ) केलेल्या आकस्मिक तपासणीत १९ डिसेंबर रोजी उघड झाला.
बाळापूर तालुक्यातील तामशी-पिंपळगाव रस्त्याला लागून असलेल्या पिंपळगाव शिवारात सरकारी जमिनीवरील टेकड्यांवर सुरु असलेल्या वाळूच्या अवैध उत्खननाची पाहणी जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी रविवार, १९ डिसेंबर रोजी केली. त्यामध्ये पिंपळगाव शिवारात र्इ-क्लास जमिनीवर असलेल्या टेकड्या पोखरुन ठिकठिकाणी मोठमोठे भुयार तयार करण्यात आले असून, या भुयारांमधून वाळूचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच अवैध उत्खननातून साठविलेल्या वाळूची ट्रॅक्टरव्दारे अवैध विक्री करण्यात येत असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले.
३५० एकर जमीनीवरील टेकड्यांवर उत्खनन !
पिंपळगाव शिवारातील ३५० एकर र्इ-क्लास जमीनीवरील टेकड्यांवर सर्वत्र खोल भुयारे करुन वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. या अवैध उत्खननातून अवैध वाळू विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे वास्तव जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर आले.
शासनाच्या ‘राॅयल्टी’ला चुना !
टेकड्यांवर भुयारे तयार करुन मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करण्यात येत असून, त्यामध्ये साठविण्यात आलेल्या वाळूची अवैध विक्री करण्याचा गोरखधंदा सुरु असून, त्यामुळे वाळूच्या स्वामीत्वधन शुल्कापोटी (राॅयल्टी) शासनाच्या तिजोरित जमा होणारा महसूल बुडत आहे.
बाळापूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात र्इ-क्लास जमिनीवरील टेकड्या पोखरुन ठिकठिकाणी भुयार तयार करुन त्यामधून वाळूचे अवैध उत्खनन करण्यात येत असल्याचा प्रकार आढळून आला. त्यानुषंगाने वाळूचे अवैध उत्खनन करुन अवैध विक्री करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रणिता चापले
जिल्हा खनिकर्म अधिकारी