वाळूचे अवैध उत्खनन : शाखा अभियंता करणार जागेचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:42 AM2018-02-07T07:42:20+5:302018-02-07T07:42:22+5:30
कारंजा-रमजानपूर येथे चार वर्षांपूर्वी पानखास नदीपात्रात विदर्भ पाटबंधारे मंडळाच्या माध्यमातून साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले असून, याच पानखास नदीच्या पात्रातून नक्की किती वाळूचे उत्खनन झाले.
बोरगाव वैराळे : नजीकच्या कारंजा-रमजानपूर येथे चार वर्षांपूर्वी पानखास नदीपात्रात विदर्भ पाटबंधारे मंडळाच्या माध्यमातून साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले असून, याच पानखास नदीच्या पात्रातून नक्की किती वाळूचे उत्खनन झाले, हे ठरविण्यासाठी तहसीलदार दीपक पुंडे यांनी बाळापूर पंचायत समितीला पत्र देऊन शाखा अभियंत्यांना वाळू उत्खनन केलेल्या खड्डय़ांचे मोजमाप करून अहवाल सादर करण्याचा आदेश ५ फेब्रुवारी रोजी दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
कारंजा रमजानपूर येथील पानखास नदीच्या पात्रात अंदाजे १00 एकर जमिनीवर विदर्भ पाटबंधारे मंडळाच्या माध्यमातून खारपाणपट्टय़ातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम बंद पडले होते; मात्र १७ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला जिल्हय़ातील रखडलेल्या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन कामाचे रीतसर उद्घाटन केल्यानंतर कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू करण्यात आले. या कामासाठी लागणार्या वाळूचे स्वामी सर्मथ कंपनीने पानखास नदीपात्रात जेसीबी मशीन लावून अवैधरीत्या उत्खनन केले असल्याची माहिती तहसीलदार दीपक पुंडे यांना गोपनीय सूत्राकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी मंडळ अधिकारी मेश्राम, तलाठी गजानन भागवत, सतीश कराड, दिवाकर टाले, काळे यांना स्वामी सर्मथ इंजिनिअर कंपनीच्या कारंजा रमजानपूर येथील कामाच्या ठिकाणी जाऊन अवैधरीत्या वाळू गोळा केली आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मंडळ अधिकारी मेश्राम व तलाठी काळे, गजानन भागवत, सतीश कराड, दिवाकर टाले, राजू डाबेराव यांच्या पथकाने प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अवैधरीत्या गोळा केलेली ४५१७ ब्रास वाळू जप्त करून पंचनामा तहसीलदारांना सादर केला. या वाळूची शासकीय किंमत १५८३३ रुपये ब्रासप्रमाणे सात कोटी १५ लाख १७ हजार ६६१ रुपये आहे. त्यामुळे तहसीलदारांनी स्वामी सर्मथ कंपनीचे प्रमुख क्षीरसागर यांना नोटीस बजावून गोळा केलेल्या वाळूची त्यांच्याकडे रॉयल्टी आहे किंवा नाही, याबाबत जबाब नोंदविण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी दोड यांनी बाळापूरचे तत्कालीन तहसीलदार संतोष शिंदे, विद्यमान तहसीलदार दीपक पुंडे व वाळूचा पंचनामा करणारे हातरुणचे मंडळ अधिकारी मेश्राम व स्वामी सर्मथ कंपनीचे प्रमुख क्षीरसागर यांना अकोला येथील कार्यालयात हजर राहण्यास बजावले होते.
तर मंडळ अधिकारी मेश्राम यांनी त्यांनी सादर केलेला ४५१७ ब्रास वाळू गोळा केली असल्याचा अहवाल योग्य असून, अहवालासोबत जप्त केलेल्या वाळूचे फोटो तहसील कार्यालयात सादर केले आहेत; परंतु पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वामी सर्मथ इंजिनिअर कंपनीने जप्त केलेली वाळू बांधकामासाठी वापरल्यामुळे आता त्या ठिकाणी वाळू शिल्लक नाही व ज्या ठिकाणांहून वाळू काढली, ते खड्डेदेखील जेसीबी मशीनद्वारे बुजवून टाकण्यात आले असल्याचे मंडळ अधिकारी मेश्राम यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासमोर बाजू मांडताना सांगितले. त्यावर जिल्हा खनिकर्म अधिकार्यांनी बाळापूरचे तहसीलदार पुंडे यांना आदेश देऊन उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करण्यासाठी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यांना पत्र देऊन पानखास नदीपात्रातून किती ब्रास वाळू उत्खनन झाली, याचा अहवाल सादर करण्यास सांगा व शाखा अभियंत्यांनी अहवाल सादर केल्यानंतर दंड आकारण्याबाबत कारवाई करण्यास सांगितले.
अवैधरीत्या वाळू उत्खनन करणार्या कंत्राटदारावर काय कारवाई करावी, यासाठी कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून, काय कारवाई केली, याची माहिती दिली जाईल.
- दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर